

बेळगाव : जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने सामान्य जनतेचे जगणे अवघड बनले आहे. केंद्राच्या भूमिकेमुळे जनतेला महागाईला सामोरे जावे लागत आहे. केंद्र सरकारच्या विरोधात बेळगावात बेळगाव आणि चिकोडी काँग्रेसच्यावतीने विराट निषेध मेळावा दि. 27, 28 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. जिल्हा काँग्रेस कार्यालयात मंगळवारी पूर्वतयारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर त्यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, महागाईविरोधात बंगळूर येथे निषेध मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यानंतर बेळगाव येथील सीपीएड मैदानावर निषेध मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये सुमारे 30 हजारहून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. गेल्या 11 वर्षात भाजपने जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविले आहेत. परंतु त्यांच्याकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. जनाक्रोश यात्रेच्या माध्यमातून जनतेला खोटी माहिती देण्यात येत आहे. त्याविरोधात निषेध मेळाव्याचे आयोजन केले आहे.
महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, केंद्र सरकारने स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ केली आहे. यातून गरिबांचे रक्त शोषून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केल्याने सामान्यांना दिलासा देण्यासाठी आमच्या सरकारने पंचहमी योजना लागू केली आहे.
पंचहमी योजनेमुळे महागाई वाढत असल्याचा खोटा आरोप भाजपकडून केला जात आहे. भाजप नेत्यांतील अंतर्गत वाद जनतेला समजू नयेत, यासाठी राज्य सरकारवर खोटे आरोप करण्यात येत आहेत.
यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष जी. सी. चंद्रशेखर, आमदार राजू सेट, माजी मंत्री बाबासाहेब पाटील, काँग्रेस कार्याध्यक्ष अभिषेक दत्ता, विनय नावलगट्टी, सुनील हणम्मण्णावर आदीसह मान्यवर उपस्थित होते.
केंद्र सरकारविरोधात 27 किंवा 28 रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी निषेध मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये अ. भा. काँग्रेस कमिटी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस रणदीप सुरजेवाला, वेणुगोपाळ, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहे. सीपीएएड मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.