

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack
पुणे: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील पर्यटक संतोष जगदाळे व कौस्तुभ गनबोटे हे गंभीर जखमी झाल्यानंतर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे रात्री उशिरा सांगण्यात आले. काल दुपारी साडेतीनच्या सुमारास हा पर्यटकांवर हल्ल्याची धक्कादायक घटना घडली.
संतोष जगदाळे (वय 54) व कौस्तुभ गनबोटे (वय 56) हे दोघे मित्र कुटुंबीयांसमवेत कमिन्स कंपनीतील आपल्या मित्रपरिवारासह तीनच दिवसांपूर्वी काश्मीर सहलीला गेले होते. दुपारी ते पहलगाम पाहण्यासाठी गेले असता अचानक आलेल्या दहशतवाद्यांनी जगदाळे यांची मुलगी आसावरी हिच्यासमोर नावे विचारत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले असून, उपचारांसाठी त्यांना श्रीनगर येथे हलविण्यात आल्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.
दै. पुढारीने रात्री उशिरा पर्यटकांना सहाय्य करण्यासाठी श्रीनगरमधील जिल्हा मुख्यालयात स्थापन करण्यात आलेल्या इमर्जन्सी कंट्रोल रूमशी संपर्क साधला असता उपचार सुरू असताना संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. जगदाळे कुटुंबीय कर्वेनगर परिसरात राहतात.
गोळीबार झाला तेव्हा जगदाळे यांची पत्नी प्रगती व गनबोटे यांच्या पत्नी संगीताही थोड्याच अंतरावर होत्या. या घटनेने आसावरीसह या दोघींनाही जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यांच्यासोबतचे इतर पर्यटकही हादरून गेले आहेत. या तिघीही संपर्कात असल्याचे मोहोळ यांनी जगदाळे यांच्या पुण्यात (Pune) असलेल्या वहिनींशी बोलताना सांगितले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी कर्वेनगर येथे जगदाळे यांच्या वहिनींची व अन्य नातेवाइकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.