निनाद देशमुख
पुणे : गोखलेनगर येथील जनवाडी परिसरात महापालिकेच्या भवन विभागामार्फत बांधण्यात आलेल्या माजी आमदार कै. बी. डी. किल्लेदार मंडईचा ताबा 15 वर्षे उलटूनही मंडई विभागाने घेतला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही मंडई आम्हाला न विचारता उभारण्यात आली असल्याचे मंडई विभागाचे म्हणणे आहे, तर आम्हाला जशी मागणी करण्यात आली होती तशी ही मंडई तयार करण्यात आली आहे, असे सांगत भवन विभागाने हात वर केले आहेत. सध्या या मंडईत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून, गर्दुल्ले आणि दारुड्यांसाठी ही मंडई ‘अड्डा’ बनली आहे. (Latest Pune News)
गोखलेनगर येथील जनवाडी परिसरात पालिकेकडून 15 वर्षांपूर्वी माजी आमदार कै. बी. डी. किल्लेदार यांच्या नावाने भाजी मंडई उभारण्यात आली. दोन मजल्यांचे पार्किंग तसेच 28 गाळ्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, अद्याप या इमारतीचा ताबा मंडई विभागाने घेतलेला नाही. दरम्यान, मंडई विभागाने या ठिकाणी 32 गाळे उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यासाठी येथे आणखी एक मजला वाढविणे आवश्यक होते.
मात्र, भाजीविक्रेत्यांची तळमजल्यावर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी असताना त्यांना पहिल्या आणि दुसर्या मजल्यावर भाजीविक्री करण्यास सांगितले. मात्र, यासाठी भाजीविक्रेते तयार नव्हते. दरम्यान, या वादात मंडई विभागाने भवन विभागामार्फत बांधलेल्या या इमारतीचा ताबा घेण्यास नकार दिल्याने गेल्या 15 वर्षांपासून ही इमारत वापराअभावी पडून आहे.
या संदर्भात येथील स्थानिक योगेश धावडे यांनी महापालिकेच्या अनेक चकरा मारून मंडई आणि भवन विभागाच्या अधिकार्यांशी प्रत्यक्ष भेटून व वेळोवेळी पत्र व्यवहार करून येथील समस्या मांडली. मात्र, दोन्ही विभागांनी त्यांना उत्तर देण्यास टाळटाळ केली आहे.
या इमारतीत सध्या स्थानिक नागरिक येऊन कचरा टाकत आहेत. तसेच इमारतीच्या मोकळ्या जागेत गर्दुल्ले, मद्यपी दिवसभर पडून राहतात. 15 वर्षांपासून ही इमारत वापराअभावी पडून असल्याने इमारतीचीदेखील दुरवस्था झाली आहे. ही इमारत बांधण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा खर्च आला असून, हा खर्च वाया गेला आहे.
या मंडईचे काम पूर्ण होऊन अनेक वर्षे झाली. मात्र, अद्याप ही इमारत पडून आहे. आम्हाला रस्त्यावर बसून व्यवसाय करावा लागत आहे. गाळ्यांचे भाडेदेखील जास्त आहे. सध्या या इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणात दारुडे आणि गर्दुल्ले यांचा वावर असतो. याचा त्रास स्थानिकांना होत आहे.
इमारत हस्तांतरण करण्यास टाळाटाळ ही इमारत तयार होऊन 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही इमारत हस्तांतरित का झाली नाही, याबाबत भवन विभागाला विचारले असता, आम्ही मंडई विभागाच्या सूचनेनुसार इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्यानंतर ही इमारत हस्तांतरित करण्यात यावी, यासाठी मंडई विभागाला पत्रव्यवहारदेखील केला आहे. मात्र, ही इमारत अद्याप त्यांनी ताब्यात घेतली नाही, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.- एक स्थानिक विक्रेता