सोमेश्वरनगर: बागायतीपट्टा म्हणून ओळख असलेल्या बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाचा सर्वाधिक फटका शेळ्या आणि मेंढ्यांनाही बसत आहे. चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी चांगलेच हाल होत आहेत. काही ठिकाणी उन्हामुळे लहान करडू मृत्युमुखी पडत आहेत, तर काही ठिकाणी आजारी पडत आहेत. त्यामुळे मेंढपाळ चिंताग्रस्त झाले आहेत.
बारामती तालुक्यात वन विभागाच्या हद्दीतील गवत पूर्णपणे जळाले असून, पाण्याची तळीही पूर्ण आटली आहेत. सोमेश्वरनगर परिसरातील पाण्याचे स्रोत आटल्याने तसेच येथील पाण्याची तळी कोरडी पडल्याने मेंढपाळ निरा डावा कालवा आणि त्यातून वाहणार्या फाट्यांद्वारे येणार्या पाण्यातून शेळ्या-मेंढ्यांची तहान भागवत आहेत. (Latest Pune News)
उसाचे शेत मोकळे झाल्याने त्या ठिकाणी तसेच शेतातील बांध, ओढे, नाले येथे असलेले गवत, झाडे-झुडपे आदींवर गुजराण करीत मेंढपाळ शेळ्या-मेंढ्या जगवत आहेत. उन्हापासून शेळ्या-मेंढ्यांचे संरक्षण होण्यासाठी तालुक्यातून जाणार्या निरा नदी व निरा डावा कालव्याशेजारील असलेल्या झाडा-झुडपांचा आधार दुपारच्या सत्रात घेतला जात आहे. मे महिन्यात तरी अवकाळी पाऊस व्हावा, अशी अपेक्षा मेंढपाळ बांधव व्यक्त करीत आहेत.
मेंढ्यांच्या चार्याचा प्रश्न गंभीर
बारामती तालुक्यातील जिरायती भागात मेंढपाळांची संख्या जास्त आहे. चार्याचा प्रश्न गंभीर झाल्याने अनेक मेंढपाळ चार्याच्या शोधात बागायतीपट्ट्यात दाखल होत आहेत. तरकारी पिकांना चांगला दर नसल्याने अनेक मेंढपाळ पिके खायला घालून, शेळ्या-मेंढ्या जगवत आहेत. बागायतीपट्ट्यात सध्या काही प्रमाणात चारा उपलब्ध असला तरी तो पुरेसा नाही. येणार्या काळात जनावरांच्या चार्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
यात्रा-जत्रांवर दुष्काळाचे सावट
जिरायती भागात सध्या पाणीटंचाई जाणून लागली आहे. सध्या सुरू असलेल्या यात्रा-जत्रांवर दुष्काळाचे सावट आहे. जनावरांच्या चार्याची कमतरता जाणवू लागली असल्याने जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न शेतकर्यांपुढे आहे.