भिगवण: उजनीतील वाढत्या प्रदूषणावरून आता पुन्हा एल्गार पुकारण्यात आला असून, या लढ्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागातील उजनीकाठचे नागरिक एकत्रित पुढे सरसावले आहेत. प्रदूषणामुळे संपूर्ण पर्यावरणाचा र्हास होत असल्याने आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार भिगवण येथील पूर्व नियोजन बैठकीत करण्यात आला आहे.
16 मे रोजी भारताचे जलपुरुष मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्रसिंह हे उजनीला दुसर्यांदा भेट देऊन प्रदूषणाविरोधाच्या लढ्यात सहभागी होणार असल्याने उजनी प्रदूषणविरोधातील लढ्याची धार वाढणार आहे. (Latest Pune News)
जल अभ्यासक नरेंद्र चुघ यांच्या अध्यक्षतेखाली भिगवण येथे मराठा महासंघाच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उजनी प्रदूषणा विरोधातील लढ्याची पुढील रणनीती ठरवण्यात आली. या लढ्यात उजनी परिसराच्या गावातील नागरिक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर आदींना सहभागी करून घेण्याचा निर्णय झाला.
उजनीच्या प्रदूषित पाण्यावरून सतत आक्रोश होऊनही कोणतेही सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही. सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. वास्तविक पाणी शुद्धीकरणावर आधी भर द्यायला हवा, असे मत व्यक्त करण्यात आले.
पिंपरी चिंचवड, कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील सर्वात जास्त रासायनिक पाणी उजनीत थेट मिसळले जात असल्याने प्रदूषणात कमालीची वाढ झाल्याचा आरोप या वेळी उपस्थितांनी केला. यावरून आता 16 मे रोजी जलपुरुष राजेंद्रसिंह हे भिगवण येथे उपस्थित राहून उजनी प्रदूषणाविरोधाच्या लढ्याला मार्गदर्शन करणार आहेत.
राजेंद्रसिंह यांची यानिमित्ताने उजनीला दुसरी भेट ठरणार आहे. गेल्या 15 वर्षांपूर्वी त्यांनी उजनीला भेट देऊ उजनीचे पाणी पिण्यास नव्हे तर वापरण्यायोग्य नसल्याचे सांगत ही तर पुणेकरांची मैली राजनीती असल्याचे म्हटले होते.
दरम्यान या उजनी प्रदूषण मुक्ती आंदोलनाच्या पूर्वनियोजीत बैठकीस बाबा भोईर, प्रकाश ढवळे, भजनदास पवार, रमेश धवडे, सखाराम खोत, फैय्याज शेख, विठ्ठल बंडगर, शिवदास सूर्यवंशी, अर्जुन जगताप, निळकंठ शिंदे, दत्तात्रय पवार, सुहास गलांडे, सोमनाथ पवार, मधुकर टकले, रामदास पवार, आप्पासाहेब गायकवाड, ज्ञानदेव कण्हेरकर आदी उपस्थित होते.
उजनीतील पाण्याने वेगवेगळे आजार
उजनीतील पाणी कमालीचे प्रदूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कॅन्सर तसेच इतर आजाराचे रुग्ण प्रचंड वाढले आहेत. शेतीची पोत खराब झाली आहे. जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाला आहे. माश्यांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. दैनंदिन विकतचे पाणी घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.