पुणे: जिल्हा परिषदेच्या 'ग्लोबल गुरुजी' या आंतरराष्ट्रीय शिक्षक अनुभव उपक्रमाच्या निवड प्रक्रियेतील दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएस) यांच्या तज्ज्ञ समितीने १३६ शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या. अंतिम निवडीसाठी शिक्षकांची शैक्षणिक आणि प्रशासकीय कामगिरीही विचारात घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
निवड प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ९ ऑगस्ट रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील ३०३ क्लस्टरमधून निवडलेल्या १,२१२ शिक्षकांपैकी १,०२५ शिक्षकांनी १३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. या परीक्षेच्या निकालाच्या आधारे पुढील टप्प्यासाठी १३६ शिक्षकांची निवड करण्यात आली. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील दोन केंद्रप्रमुखांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या.
अंतिम निवडीमध्ये मुलाखतीतील कामगिरीसोबतच मागील वर्षातील शिक्षकांची शैक्षणिक व प्रशासकीय कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. शाळेचे अंतर्गत मूल्यमापन, विद्यार्थ्यांना मिळालेल्या शिष्यवृत्ती, विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांतील यश, नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थी नावनोंदणी, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न, समुदायाचा सहभाग आणि शिक्षकांना मिळालेले पुरस्कार आदी निकषांचा विचार केला जाणार आहे.
या सर्व निकषांच्या आधारे अंतिम ४५ शिक्षक, तीन केंद्रप्रमुख, एक विस्ताराधिकारी, एक गटशिक्षणाधिकारी आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा एक प्रतिनिधी यांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शिक्षकांना सिंगापूरमधील शैक्षणिक अभ्यासदौऱ्याची संधी मिळणार आहे.
अभ्यासदौऱ्यानंतर हे शिक्षक 'शिक्षणदूत' म्हणून कार्य करणार असून, सिंगापूरमधील शैक्षणिक पद्धती, नावीन्यपूर्ण अध्यापन तंत्रे आणि अनुभव इतर शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार आहेत. 'ग्लोबल गुरुजी' उपक्रमातील अंतिम शिक्षकांची घोषणा शिक्षकदिनाच्या निमित्ताने करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.