सुनील जगताप
पुणे: प्लास्टिक प्रदूषण आपल्या पृथ्वीच्या संकटाच्या घातक परिणामांना वाढवत आहे. जागतिक स्तरावर अंदाजे 11 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा दरवर्षी जलीय परिसंस्थांमध्ये मिसळतो तर कृषी उत्पादनांमध्ये प्लास्टिकचा वापर वाढल्याने मायक्रोप्लास्टिक्स सांडपाणी आणि लँडफिल्समधून मातीमध्ये जमा होतात. ग्लोबल वॉर्मिंगवाढीवर प्लास्टिक प्रदूषणाचा मोठा परिणाम झाला असून, त्यालाच आळा घालण्याची आवश्यकता आहे.
जगभरामध्ये 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. प्लास्टिक प्रदूषणाचा मुकाबला ही यावर्षीची थीम आहे. यावर्षीचा कार्यक्रम प्लास्टिक कचरा निर्मूलनाच्या आवश्यकतेवर लक्ष केंद्रित करीत असून, ही एक व्यापक पर्यावरणीय समस्या झाली आहे. प्लास्टिक समाजाच्या सर्व घटकांमध्ये पसरले आहे. (Latest Pune News)
दरवर्षी जगभरात 380 दशलक्ष टनापेक्षा जास्त प्लास्टिकचे उत्पादन होत आहे. काही अहवाल असे सूचित करतात की, 50 टक्क्यांपर्यंतचा वापर केवळ काही क्षणांसाठी केला जातो. असा अंदाज आहे की, दरवर्षी 10 दशलक्ष टनांपेक्षा जास्त प्लास्टिक आपल्या महासागरात टाकले जाते.
सूक्ष्म प्लास्टिकचे प्रतिकूल परिणाम विशेषतः गर्भातील मुलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये तीव्र पणाने आढळतात. ज्यामध्ये अकाली जन्म, मृत जन्म, पुनरुत्पादक अवयवांचा जन्मदोष, न्यूरो डेव्हलपमेंटल कमजोरी, फुप्फुसांची वाढ आणि बालपणातील कर्करोगाचा धोका वाढतो.
तसेच वाढत्या तापमान आणि अतिवृष्टी, अचानक पूर, हवामान बदलामुळे भूस्खलनासारख्या अतिवृष्टीसंबंधित समस्यांमुळे आरोग्य धोक्यात येते. मायक्रो प्लास्टिक ही आता आपल्या इको सिस्टिमच्या आरोग्याबाबत एक प्रमुख चिंतेचा विषय बनली आहे. मासे आणि मानवांवर त्यांच्या विषारी प्रभावामुळे मायक्रो प्लास्टिक्स ही जागतिक समस्या म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
प्रत्येकाकडून 8 वृक्ष लागवड आवश्यक
दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण झाडे लावतो. मात्र दुर्दैवाने जगण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. भारतात 1.4 अब्ज लोकसंख्येमागे 3.5 अब्ज झाडे आहेत. पुणे शहरात सुमारे 70 लाख लोकसंख्येमागे 40 लाख झाडे आहेत.
निरोगी जगण्यासाठी प्रत्येक माणसाला वर्षाला 740 किलो ऑक्सिजनची आवश्यकता असते. आता प्रत्येक पूर्ण वाढलेले झाड वर्षाला सुमारे 100 किलो ऑक्सिजन तयार करते. त्यामुळे प्रत्येक माणसाला निरोगी जगण्यासाठी सुमारे 8 झाडे लावुन संवर्धन करणे आवश्यक आहे.
प्लॅस्टिकच्या वाढत्या वापराने आणि वृक्षसंख्या कमी झाल्याने वातावरणात बदल होत आहेत. आपल्या ग्रहावरील सर्व प्राण्यांचे विशेषत: आपण मानवांचे प्रचंड नुकसान करत आहे. या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वजण आपल्या भावी पिढ्यांसाठी एक निरोगी, हिरवीगार आणि स्वच्छ पृथ्वी माता मागे ठेवण्याची शपथ घेऊ या.- शशिकांत दळवी, पर्यावरणतज्ज्ञ आणि निवृत्त कर्नल