शिवदास शितोळे
परिंचे: ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न केवळ पोलिस किंवा प्रशासनापुरता मर्यादित नाही. पालक, शिक्षक, नातेवाईक, समाज आणि प्रशासन या प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी पार पाडली, तरच मुलींना सुरक्षित वातावरण मिळू शकते, असे मत विविध क्षेत्रांतील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
एखाद्या मुलीवर अन्याय होत असताना समाजाने केवळ बघ्याची भूमिका घेणे ही चिंतेची बाब आहे. आज दुसऱ्याच्या मुलीवर घडणारी घटना उद्या आपल्या घरापर्यंत पोहोचू शकते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. समाजाचे मौन तुटल्याशिवाय महिलांवरील अत्या चारांना आळा बसणार नाही, असे सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब पवार यांनी सांगितले.
पालकांची भूमिका म्हणजे मुलींशी विश्वासाचे नाते निर्माण करणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि कोणतीही घटना न घाबरता सांगण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे. शिक्षकांची भूमिका म्हणजे शाळा-कॉलेजमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करणे, लैंगिक संवेदनशीलतेबाबत मार्गदर्शन करणे, तक्रारी गांभीर्याने घेणे आणि विद्यार्थिनींना मानसिक आधार देणे. नातेवाईकांची भूमिका म्हणजे अनावश्यक बंधने न घालता मुलींना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सुरक्षिततेबाबत सातत्याने संवाद ठेवणे आणि आवश्यकतेच्या वेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे.
सुरक्षिततेची साखळी
सुरक्षिततेची साखळी घरापासून समाजापर्यंत पालकांचा विश्वास, शिक्षकांचे संवेदनशील मार्गदर्शन, समाजाची तत्पर भूमिका आणि प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी या चार घटकांची साखळी मजबूत झाली तरच विद्यार्थिनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकते.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळेने सर्वतोपरी खबरदारी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. त्याचबरोबर पालकांनीही मुलींशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवला, तर त्यांच्या मनातील भीती आणि अडचणी वेळेत समजू शकतात. शाळेत आम्ही नियमित जनजागृती आणि मार्गदर्शन सत्रे आयोजित करतो.वृषाली धुमाळ, प्राचार्या, श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल