पुणे: कात्रजमधून अपहरण झालेल्या दोन वर्षीय मुलीची भारती विद्यापीठ आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त करवाई करत धाराशिवमधून सुखरूप सुटका केली. भीक मागण्यासाठी तिचे अपहरण झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सुनील सीताराम भोसले (वय 51, रा. मोतीझारा), शंकर उजन्या पवार (वय 50), गणेश बाबू पवार (वय 35), शालुबाई प्रकाश काळे (वय 45, तिघेही रा. डिकमाळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव), मंगल हरफुल काळे (वय 19, रा. खडकी रेल्वे लाईन झोपडपट्टी, पुणे) यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 2 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Latest Pune News)
ही घटना 25 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वंडरसिटी झोपडपट्टी पाण्याच्या टाकीजवळ कात्रज परिसरात घडली होती. याप्रकरणी धनसिंग हनुमंत काळे (वय 25, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेच्या दिवशी फिर्यादी यांच्या पत्नीने त्यांच्या दोन वर्षीय मुलीला झोळीत झोपविले होते. यादरम्यान, दुसरी मुलगी रडल्याने त्यांना जाग आली.
या वेळी झोळी पाहिली असता त्यामध्ये मुलगी दिसून आली नाही. दोन जुळ्या मुलीपैकी एकीचे अपहरण झाले होते. आरोपींनी परिसरात फिरून माहिती घेतली होती. त्यांना माहिती होते की, या दोन जुळ्या मुली आहेत. मुलगी मिळून येत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर धनसिंग यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
कात्रज परिसरापासून ते पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत पोलिसांनी तब्बल 140 सीसीटीव्ही कॅमेर्यांची तपासणी केली. त्या वेळी त्यांना दोन पुरुष आणि एक महिला असे तिघेजण मुलीला पुणे रेल्वे स्टेशनकडे घेऊन जाताना दिसून आले. स्टेशन परिसरातील कॅमेरे पाहिले तेव्हा या तिघांसोबत आणखी दोघे असल्याचे पुढे आले.
पोलिसांनी बातमीदारामार्फत पडताळणी केली तेव्हा हे आरोपी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमधील असल्याचे समजले. त्यानुसार भारती विद्यापीठ आणि गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सुनील, शंकर आणि शालुबाई या तिघांना ताब्यात घेतले. या वेळी अपहरण केलेली मुलगी त्यांच्या ताब्यात मिळून आली. यानंतर पोलिसांनी गणेश आणि मंगल या दोघांना देखील पकडले.
पोलिसांनी तपास करत तिघांना तुळजापूरमधून तर दोन आरोपींना खडकीतील रेंज हिलमधून ताब्यात घेत अटक करण्यात आली. आरोपींचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून त्याबाबतचा सखोल तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी युक्तिवादादरम्यान सरकारी वकील अमर ननावरे यांनी केली.
तिघे आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार
गुन्ह्यातील सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. यामध्ये भोसले विरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात दोन, लोहा पोलिस ठाण्यात तीन, माकोळी व चाकोर पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. तर, उजन्या हा अपंग असून तो पुणे स्टेशन परिसरात भीक मागण्याचे काम करतो. त्याविरोधातही तुळजापूर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. तर, पवार विरोधात भिगवण पोलिस ठाण्यात दोन तर हडपसर व इंदापूर पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.