Ghod Dam Farmers Protest Pudhari
पुणे

Ghod Dam Farmers Protest: शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित; संतप्त शेतकऱ्यांचा रांजणगाव एमआयडीसीला पाणी रोखण्याचा इशारा

घोड धरणाच्या बॅकवॉटरमधील कृषिपंपांची वीज तोडल्याने शिरूर तालुक्यात संताप; ‘आधी आमच्या पिकांना पाणी द्या, मग उद्योगांना’, शेतकऱ्यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

निमोणे: दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणाच्या शिरूर हद्दीतील बॅकवॉटरमध्ये सर्व कृषी पंपाची वीज तोडण्यात आली आहे. ज्या धरणासाठी आमच्या शेतजमीनी गेल्या, आमच्या तीन-तीन पिढ्या त्याची आजही किंमत मोजते. त्या आमच्या हक्काच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवून सरकार रांजणगाव औद्योगिक वसाहतीला मुबलक पाणीपुरवठा करत आहे. सरकारचे हे धोरण आम्हाला अमान्य असून, आमच्या शेतीचा वीज जोड तातडीने पूर्ववत करा अन्यथा रांजणगाव एमआयडीसीला एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही, असा इशारा बबनराव वाळके यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी जलसंपदा प्रशासनाला दिला.

मंगळवारी (दि. १३) शेतकऱ्यांना गाफील ठेवत महावितरण कंपनीने जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार चिंचणी, गुणाट, शिंदोडी, निमोणे, गोलेगाव, तर्डोबाचीवाडी आदी परिसरातील नदीकाठचा वीजपुरवठा खंडित केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत निमोणे (ता. शिरूर) येथे राष्ट्रवादीचे नेते बबनराव वाळके यांच्या नेतृत्वाखाली तातडीची निषेध सभा आयोजित केली. दुष्काळाच्या नावाखाली सरकार शेतकऱ्याला चिरडू पाहत आहे. धरणामध्ये ९३ टक्के पाणीसाठा आहे.

बदलत्या वातावरणात प्रचंड प्रमाणात बाष्पीभवन होत आहे, पाणी वाया जाण्यापेक्षा हातातोंडाला आलेल्या पिकांना पाणी द्या, पुढील काही दिवसांत ऊस तुटला जाणार आहे, त्यानंतर तुमचं धोरण राबवा, असा एकमुखी सूर या बैठकीत निघाला. आमच्या पाण्यावर गदा आली तर आम्ही एमआयडीसीला पाणीपुरवठा होऊ देणार नाही. उद्योगपतींना पायघड्या घालून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारच्या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो, सरकारमध्ये हिंमत असेल तर आमचे पाणी बंद करून एमआयडीसीला पाणी नेऊन दाखवा, असे थेट आव्हान घोडगंगाचे संचालक संजय काळे यांनी या बैठकीत दिला.

दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सहाय्यक अभियंता महेश शिंदे व वैभव काळे यांनी निमोणे येथे भेट दिली. संतप्त शेतकऱ्यांनी आमची जनावरे पाण्यापासून उपाशी आहेत, गाया-गुरांना पाण्यापासून वंचित ठेवून तुम्ही काय मिळवले, असा खडा सवाल उपस्थित केला. आक्रमक शेतकऱ्यांच्या भडीमाराने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा निर्णय सरकारचा आहे, सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे आमचे कर्तव्य आहे; मात्र तुमच्या भावना आम्ही वरिष्ठांना कळवू, असा शब्द शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला.

या वेळी राष्ट्रवादीचे नेते बबनराव वाळके, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय काळे, शिवसेना (उबाठा) पदाधिकारी अनिल पवार, आबासाहेब धावडे, चिंचणीचे माजी सरपंच शामराव पवार, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीश कोळपे, ज्येष्ठ नेते एकनाथराव वाळुंज, शामकांत ढोरजकर, प्रकाश काळे, भाजप नेते प्रदीप काळे, सागर काळे, शशिकांत काळे, जे. आर. काळे, माऊली बहिरट व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

घोड नदीपात्र पडू लागले कोरडे

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखणगाव येथे घोड नदी आटली आहे. नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. घोड नदीच्या तीरावरील गावांमध्ये उसाचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे. सध्या नदीपात्रात पुरेसे पाणी नसल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

आगामी काळात पाऊस झाला नाही आणि डिंभा धरणातून घोड नदीत पाणी सोडण्यात आले नाही, तर उसाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तरकारी पिकांनाही पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. डिंभा धरणातून घोड नदीत पाणी सोडण्याबाबत निर्णय घ्यावा, तसेच आंबेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शेतमाल प्रक्रिया संस्थेचे तालुकाध्यक्ष सतीश रोडे, सोमनाथ पोंदे, माजी सरपंच प्राजक्ता शिरीष रोडे, दस्तगीर मुजावर, खरेदी-विक्री संघाचे संचालक मनोज रोडे आदींनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT