पुणे: पुणे जिल्ह्यातील घनगड किल्ला सर्वांना परिचित आहे. या घनगडाची गडदेवता म्हणजे श्री गारजाई देवी. इतिहास संशोधक तथा मोडी लिपी अभ्यासक राज चंद्रकांत मेमाणे यांना पुणे पुरालेखागारातील घनगडाच्या कागदपत्रांत एक मोडी लिपीतील पत्र सापडले असून, त्या पत्रातील मजकुरावरून हे स्पष्ट होते की, या देवीची स्थापना छत्रपती शिवरायांनी केलेली आहे.
या मंदिरावर तयार केलेल्या शोधनिबंधाचे वाचन मेमाणे यांनी शनिवारी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत केले. हे पत्र साधारण इसवी सन १७३२ ते १७३४ यादरम्यानचे असून त्या काळातील घनगडावरील दरकदार म्हणजेच अधिकारी लक्षुमण विश्वनाथ याने थोरले बाजीराव पेशवे यांना लिहिलेल्या पत्रात हा उल्लेख आलेला आहे.
या संशोधन कार्यात पुणे पुरालेखागारातील अधिकारी शैलजा जंगम, शैलेन्द्र वाघ, लक्ष्मण भिसे, सुनीता वाघमारे तसेच घनगड प्रतिष्ठानचे नीतेश खानेकर, अतुल कसपटे यांचे आणि शोध निबंध सादर करण्यासाठी भारत इतिहास संशोधक मंडळाचे संचालक पांडुरंग बलकवडे आणि नंदकुमार निकम यांचे सहकार्य लाभले.
पत्रातील मजकूर असा आहे
किले घनगड येथे पुरातन देव श्री गारजाई आहे, ते थोरले महाराज राजश्री स्वामीची (छत्रपती शिवाजी महाराजांची) स्थापना आहे.
किल्ल्याचा सरनाईक माणकोजी कडू याचे असे म्हणणे आहे की, गारजाईची मूळ मूर्ती काढून तिथे नवी मूर्ती बसवावी.
यावर थोरले बाजीराव पेशवे यांनी जोवर देवीचा दृष्टांत होत नाही तोवर सदर मूर्तीला हातही लावू नये, अशी आज्ञा यापूर्वीच केल्याचे पत्रात नमूद केले आहे.
या शिलालेखातील महाराजांचा उल्लेख नेमका कोणत्या महाराजांचा हे आजवर ज्ञात नव्हते. कारण त्यावर तारीख, वार इत्यादींचा उल्लेख नाही.
शिलालेखतज्ज्ञ अनिल दुधाणे यांच्या मते, त्यातील ह आणि र या अक्षरांचे वळण शिवकालीन आहे.
मेमाणे यांना सापडलेल्या पत्रातील मजकुरावरून ही गोष्ट स्पष्ट होते की, गारजाई मंदिराजवळील शिलालेखातील महाराज म्हणून आलेला उल्लेख छत्रपती शिवरायांचा आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली घनगडावरील श्री गारजाई देवी आणि साष्टी प्रांतातील यशवंत गडाकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्य शासन आणि पुरातत्व विभागाकडे अशी विनंती आहे की, या दोन्ही ऐतिहासिक स्थळांचा विशेष दर्जा या सदरात समावेश करावा.राज मेमाणे, मोडी लिपी अभ्यासक, पुणे