Gen Z Pudhari
पुणे

Gen Z Reading Habits: रील्स, गेम्स अन् एआयच्या जमान्यातही जेन झींचे पुस्तकप्रेम कायम!

छापील पुस्तकांसोबत ई-बुक्स, ऑडिओबुक्स आणि पॉडकास्टला पसंती; वाचन प्रेरणा दिनानिमित्त तरुणाईच्या बदलत्या वाचनशैलीचा वेध

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सोशल मीडियावरील रील्स, ओटीटीवरील वेबसीरिज, मोबाईल गेम्स अन्‌ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) जमान्यातही जेन झी पिढीचे पुस्तकांशी असलेले नाते कायम आहे. मात्र, वाचनाची माध्यमे बदलली आहेत. छापील पुस्तकांपासून ई-बुक्स, पीडीएफ, ऑडिओबुक्स आणि पॉडकास्टपर्यंत तरुणाई वाचनाचे नवनवे पर्याय स्वीकारत आहे. प्रवासात ऑडिओ बुक ऐकणे, मोबाईलवर ई-बुक वाचणे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने पुस्तकाचा सारांश जाणून घेणे, अशी जेन झींची वाचनाची स्टाईल आहे. डिजिटल माध्यमांचा वापर वाढला असला, तरी छापील पुस्तकांचा आनंदही काही जण घेत आहेत. स्क्रीन टाइम वाढला म्हणून वाचन कमी झाले, असे चित्र नसून, आवडीनुसार वाचनाची माध्यमे निवडण्याकडे जेन झींचा कल आहे.

आयुष्यभर ज्ञानग्रहण करून आपल्या यशस्वी जीवनाचा पाया रचणारे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिन म्हणजेच १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाही हा दिवस आनंदात साजरा केला जाणार असून, त्यानिमित्त दै. ‘पुढारी’ने काही जेन झींशी संवाद साधत या पिढीतील बदलत्या वाचनविश्वाचा वेध घेतला. पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, शिवाजी सावंत, सुधा मूर्ती अशा दिग्गज लेखकांच्या साहित्यापासून ते रहस्यकथा, प्रेमकथा, विनोदी लेखन, मोटिव्हेशनल आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या पुस्तकांपर्यंत तरुणाईची आवड विस्तारली आहे.

पुस्तकांवरील पॉडकास्ट, लेखकांच्या मुलाखती, पुस्तक परीक्षणांचे व्हिडीओ आणि सोशल मीडियावरील ‘बुकटॉक’मुळे नव्या पुस्तकांविषयी माहिती त्यांना सहज मिळत आहे. मोबाईल आणि टॅबवर ई-बुक्स वाचणे, पीडीएफमधून साहित्याचा आस्वाद घेणे, इन्स्टाग्रामवरील पुस्तकविषयक रील्स, व्हॉट्सॲपवरील पुस्तक गट आणि ऑनलाईन वाचनसमूह, अशा विविध मार्गांनी तरुण साहित्याशी जोडले जात आहेत. मित्र-मैत्रिणींना पुस्तकांची शिफारस करणे, पुस्तकांची देवाणघेवाण यातूनही तरुण वाचनाची आवड जोपासत आहेत. जेन झींचे ऑनलाइन-ऑफलाइन पुस्तकप्रेमी समूह तसेच, ठिकठिकाणी वाचन कट्टेही सुरू आहेत. पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी एआयचीही मदत घेतली जात आहे.

डिजिटल माध्यमे वाचन अधिक सोयीचे करीत असली, तरी छापील पुस्तकांचेही महत्त्व कायम आहे. कलाकार कौशिक कुलकर्णी म्हणाला की, मला छापील पुस्तके वाचायला आवडतात. मी ई-बुक्सही वाचतो आणि ऑडिओ बुक्सही ऐकतो. मात्र, छापील पुस्तकांना माझी अधिक पसंती आहे. छायाचित्रकार अक्षय जाधव म्हणाला की, वाचनासाठी वेळ मिळाला नाही, तर ऑडिओबुक्स ऐकणे सोयीचे ठरते. सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे साहित्य, प्रेमकथा व विनोदी लेखनही आवडते. आमच्या पिढीतील अनेक जण वाचन करतात. कारण, वाचन महत्त्वाचे आहे.

एआयच्या मदतीनेही मिळतेय पुस्तकाची माहिती

एआयमुळे पुस्तकांपर्यंत पोहचण्याचा आणखी एक मार्ग खुला झाला आहे. एखाद्या पुस्तकाचा सारांश, कथेतील प्रमुख घटना, पात्रांची माहिती किंवा लेखकाचा विचार काही क्षणांत समजून घेता येतो. काही एआय ॲपच्या मदतीने पुस्तकातील सारांश ऑडिओ स्वरूपात ऐकण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात मोबाईलवर ई-बुक्स, पीडीएफ किंवा ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून वाचन करणे सोयीचे वाटते. पॉडकास्ट आणि सोशल मीडियावरील रील्समधूनही नव्या पुस्तकांची माहिती मिळते. तर, विविध एआय ॲपद्वारेही पुस्तकांची माहिती जाणून घेता येते; म्हणून नव्या माध्यमातून वाचन करण्यालाही मी महत्त्व देते.
साक्षी कदम, महाविद्यालयीन विद्यार्थिनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT