SRA Scam Pudhari
पुणे

SRA Scam: गवळी माथा एसआरए प्रकल्पात अनियमिततेचा आरोप; १४ वर्षांचा रखडलेला प्रकल्प वर्षभरात मार्गी

नवीन भागीदारांच्या प्रवेशानंतर झोपड्यांची संख्या वाढल्याचा दावा; प्रकल्प मंजुरी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भोसरीतील गवळी माथा येथील सर्व्हे नंबर ६५३ वर राबविण्यात आलेला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मागील तब्बल १४ वर्षांपासून रखडला होता. मात्र, या प्रकल्पात नवीन भागीदार वाढविल्यानंतर केवळ एका वर्षात हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. या प्रकल्पात मोठा गोलमाल झाला असल्याचा आरोप होत आहे.

गवळी माथा येथील हा एस.आर. ए. प्रकल्प पूर्वीपासून सन २०२४ पर्यंत गोयलगंगा प्रमोटर्स या कंपनीच्या वतीने राबविण्यात येत होता. या रखडलेल्या प्रकल्पाकडे एसआरएचे तत्कालीन सीईओ नीलेश गटणे यांचे लक्ष गेले आणि सूत्रे फिरली आणि या प्रकल्पात सन २०२४ मध्ये अतुल गोयल, बाळासाहेब लांडगे, झिशान सय्यद हे नवीन भागीदार वाढले.

त्यानंतर या सर्वांनी मिळून हेरंब इन्फ्रा एलएलपी या कंपनीच्या नावाने पुन्हा एकदा दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रस्ताव दाखल केला. या नवीन प्रस्तावात झोपड्यांची संख्या पूर्वीच्या झोपड्यांच्या तुलनेत दुप्पटीने वाढविण्यात आली आहे. विशेष म्हणजे नव्याने प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी केवळ एक महिनाच आधी म्हणजेच दि. १९ जानेवारी २०२४ रोजी विकसक नोंदणी आणि या नोंदणीच्या आधी केवळ २६ दिवस विकसक संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. सर्व्हे नंबर ६५३ मधील सुमारे ४.१० एकर (१६ हजार ६०६.०३ चौरस मीटर) क्षेत्रावर ही योजना राबविण्यात आली आहे.

एस.आर.ए.मधील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा वरदहस्त

या योजनेत फेरफार करून झोपडपट्टीधारकांपेक्षा विकसकांच्याच फायद्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. कारण हेरंब इन्फ्रा एलएलपी या विकसक कंपनीत भागिदार असलेले बाळासाहेब लांडगे यांच्या पुणे शहरातील निवासस्थानी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प विभागातील एक वरिष्ठ अधिकारी भाडेकराराने राहत होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्यानेच या प्रकल्पात मोठा गोलमाल झाल्याचे बोलले जात आहे.

तब्बल १४ वर्षे रखडलेला प्रकल्प एकाच वर्षात मार्गी कसा?

दरम्यान, हा प्रकल्प तब्बल १४ वर्षे रखडला होता. पण भागीदार बदलल्यानंतर अगदी विकसक कंपनीची स्थापना करण्यापासूनचे काम एकाच वर्षात कसे पूर्ण होऊ शकले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT