घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील गावरवाडी परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे ४ वाजता बिबट्या जेरबंद झाला. दि. २६ नोव्हेंबर रोजी शेतकरी सुधीर शिवाजी पोखरकर यांच्या शेतात हा पिंजरा लावण्यात आला होता. तब्बल १३ दिवसानंतर सोमवारी (दि. ८) रोजी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. घोडेगाव वनपरिक्षेत्रात आतापर्यंत ६ बिबट्यांना पकडण्यात आले आहे.
बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पकडलेल्या बिबट्याला प्राथमिक तपासणीसाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र, जुन्नर येथे हलवण्यात आले.
पुढील प्रक्रिया म्हणून या बिबट्याला वनतारा गुजरात किंवा देशातील अन्य प्राणी संग्रहालयात, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या परवानगीनुसार सुरक्षितरित्या पाठविण्यात येईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी दिली.