

पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. खराडी भागात टँकरच्या धडकेत सायकलस्वार महिलेचा मृत्यू झाला, तसेच हडपसर भागात रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी ज्येष्ठ महिलेचा पीएमपी बसच्या धडकेत मृत्यू झाला. याप्रकरणी खराडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खराडी भागात भरधाव टँकरच्या धडकेत सायकलस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (७ डिसेंबर) सकाळी आठच्या सुमारास घडली. सुनीता गजानन ताठे (वय ३४, सध्या रा. थिटे वस्ती, खराडी)असे मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वार महिलेचे नाव आहे. याबाबत ताठे यांचे पती गजानन (वय ४०) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी टँकरचालक गणेश ज्ञानोबा कांगणे (वय २३, रा. काळूबाईनगर, थिटे वस्ती, खराडी) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताठे दाम्पत्य नांदेड जिल्ह्यातील टाकळगावचे रहिवासी आहेत. ताठे दाम्पत्य थिटे वस्ती परिसरातील चाळीत भाड्याने खोली घेऊन राहत आहेत.
रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास सुनीता ताठे या सायकलवरुन खराडी परिसरातून निघाल्या होत्या. झेन्सार आयटी पार्कसमोर भरधाव टँकरने त्यांंना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर टँकरचालक कांगणे याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक आवारे तपास करत आहेत.
तर दुसऱ्या अपघातात पीएमपी बसच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागात रविवारी सकाळी घडली. सोजर भीमराव कुंभार (वय ७२, रा. जगताप चाळ, हडपसर ) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुंभार यांची विवाहित मुलगी धनश्री सोमनाथ कुंभार (वय ४०, रा. संतोषीमाता मंदिराजवळ, काळेपडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारर, सोजर कुंभार या रविवारी सकाळी अकराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील १५ नंबर चौकातून निघाल्या होत्या. त्यावेळी भरधाव पीएमपी बसने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या कुंभार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक कवळे तपास करत आहेत.