पुणे: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसटंचाई निर्माण होईल, या भीतीने नागरिक मोठ्या प्रमाणावर गॅस बुकिंग करीत असून, गॅस एजन्सीबाहेर गर्दी करीत आहेत. मात्र, प्रत्यक्षात गॅसपुरवठा मुबलक असून, फक्त भीतीने बुकिंगमुळे वितरणव्यवस्थेवर ताण येत असल्याचे शहरातील काही गॅसवितरकांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
समाजमाध्यमांवर फिरणारे व्हिडीओ, रील्स आणि त्यामुळे उठणाऱ्या अफवांमुळे गॅस बुकिंगच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक गॅस घरात उपलब्ध असतानाही फक्त घरात साठा करण्यासाठी गॅस बुकिंग करतात. त्याअनुषंगाने प्रत्यक्षात काय स्थिती आहे, खरेच गॅसचा तुटवडा आहे की नाही, याची दै. ‘पुढारी’कडून प्रत्यक्ष पाहणी करून गॅसवितरकांशी संवाद साधण्यात आला.
गॅसची कोणतीही कमतरता नसून पुरवठा मुबलक आहे. ग््रााहकांच्या अतिरिक्त मागणीमुळे जो गॅस दोन दिवसांत मिळत होता, त्यासाठी आता तीन ते चार दिवस लागत आहेत. आम्ही गॅसवाटपाचे त्रिस्तरीय नियोजन केले आहे. पहिल्या स्तरावर ज्यांच्याकडे एकच सिलिंडर आहे, त्यांना प्राधान्याने घरपोच गॅस दिला जात आहे. दुसऱ्या स्तरावर ज्यांचा गॅस संपला आहे, त्यांच्या सोयीसाठी शहराच्या विविध भागांत टेम्पोद्वारे थेट वितरणाची सोय केली आहे. तिसऱ्या स्तरावर डबल सिलिंडरधारकांना तीन दिवसांच्या आत पुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे.सत्यजित राजोपाध्ये, वितरक, भारत गॅस एजन्सी, पर्वती
महाराष्ट्र शासनाने व्यावसायिक सिलिंडरच्या वितरणाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. गॅसटंचाईची भीती निराधार आहे. नागरिकांनी अफवांना बळी न पडता गरजेनुसारच बुकिंग करावे; जेणेकरून वितरण यंत्रणेवर विनाकारण ताण येणार नाही.प्रवीण खंडाळकर, वितरक, राधाक्रिष्ण इंडियन गॅस एजन्सी, वानवडी
पुरवठादारांकडून आम्हाला नियमित पुरवठा होत आहे. मात्र, युद्धामुळे अनेक नागरिक घाबरून घरात गॅसचा साठा करण्यासाठी आगाऊ बुकिंग करीत आहेत. आमच्या कार्यालयासमोर गर्दी करीत आहेत. नागरिकांनी संयम ठेवावा, सर्वांना वेळेत आणि घरपोच गॅस उपलब्ध करून दिला जाईल.स्वप्निल ढमढेरे, वितरक, ढमढेरे गॅस एजन्सी