

पुणे: कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल साक्षरता आणि प्रादेशिक भाषांचे सशक्तीकरण यांचा संगम साधणाऱ्या एका महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत ख्यातनाम संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी जगातील पहिला डिजिटल द्विभाषिक एआय चॅटबॉट विकसित केला आहे. हा बॉट आयटी क्षेत्रातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी तयार करण्यात आला आहे.याचे नाव ‘आयटी करिअर गुरु’ आहे. हा बॉट इंग््राजी आणि मराठी भाषेत संवाद साधतो.
डॉ. शिकारपूर हे गेली चार दशके आयटी क्षेत्रात सक्रिय असलेले अनुभवी तज्ज्ञ आहेत. त्यांनी 67 पुस्तके लिहिली असून विविध मंचांवर शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या ज्ञानसंपदेवर हा वैयक्तिकृत एआय चॅटबॉट तयार करण्यात आला आहे. हा अभिनव एआय चॅटबॉट विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना डॉ. शिकारपूर यांच्या डिजिटल ट्विनशी संवाद साधण्याची सुविधा देईल. सामाजिक हितासाठी तयार केलेला हा जगातील पहिला द्विभाषिक डिजिटल ट्विन चॅटबॉट आहे.
डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर परंपरेने अभियांत्रिकी, उत्पादन आणि स्मार्ट पायाभूत सुविधांमध्ये केला जातो. मात्र, एखाद्या तंत्रज्ञानतज्ज्ञाचे ज्ञान, मार्गदर्शन आणि शिकवण्याची शैली शैक्षणिक उद्देशांसाठी डिजिटल स्वरूपात पुनरुत्पादित करणे ही अत्यंत क्रांतिकारी संकल्पना आहे. याचे लोकार्पण 17 मार्च रोजी पुण्यात डिजिटल साक्षरता दिनाच्या कार्यक्रमा दरम्यान होणार आहे. या ऐतिहासिक उपक्रमाला पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांची उपस्थिती राहणार आहे.