Stove Comeback Pune Pudhari
पुणे

Stove Comeback Pune: युद्धाचा परिणाम चुलीपर्यंत! गॅसटंचाईमुळे पुण्यात पुन्हा स्टोव्हचा ‘जुन्या काळाचा’ कमबॅक

शनिवार पेठेतील १०० वर्षांच्या दुकानात गर्दी; गॅस सिलिंडर टंचाईमुळे नागरिकांचा स्टोव्हकडे वाढता कल

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद जगताप

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या इंधन आणि गॅसटंचाईचा मोठा फटका पुण्यातील हॉटेल व्यावसायिक आणि मेसचालकांना बसला आहे. गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि वाढते दर यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी आता थेट अडगळीतील स्टोव्ह बाहेर काढले असून, शनिवार पेठेतील 100 वर्षे जुन्या स्टोव्हदुरुस्तीच्या दुकानात सध्या ग््रााहकांची गर्दी झाल्याचे दिसून आले.

अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम आता थेट सामान्यांच्या चुलीपर्यंत पोहोचले आहेत. व्यावसायिक सिलिंडर मिळत नाहीत. कोळसा, लाकडे महागली आहेत, मग काय करायचे? यावर उपाय म्हणून नुकतीच अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी रॉकेलवाटप करण्याची घोषणा केली अन्‌‍ त्यासाठी विस्कळीत झालेली रॉकेलची साखळी पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगितले. यासंदर्भातील माहिती मिळताच अनेकांनी आपले जुने अडगळीत पडलेले ‌’स्टोव्ह‌’ बाहेर काढून दुरुस्तीसाठी पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या वारे यांच्या 100 वर्षे जुन्या ‌’स्टोव्ह‌’ दुरुस्तीच्या दुकानाकडे धाव घेतली. त्यामुळे येथे नागरिकांची गर्दी होत आहे.

स्टोव्ह दुरुस्तीचे पुण्यातील एकमेव दुकान

पुण्यातील शनिवार पेठेतील वारे अँड सन्स हे स्टोव्ह दुरुस्तीचे एकमेव प्रसिद्ध दुकान सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. पुणे शहरच नव्हे, तर पिंपरी-चिंचवड, निगडी, लोणी काळभोर, सासवड आणि भोर-वेल्ह्यासारख्या ग््राामीण भागातूनही नागरिक जुने स्टोव्ह दुरुस्त करण्यासाठी येथे येत आहेत. गॅस नसल्यामुळे काहींनी चुलीचा, तर काहींनी इलेक्ट्रीक शेगड्यांचा पर्याय निवडला आहे. मात्र, रॉकेल मिळणार असल्याने स्टोव्ह दुरुस्त करण्यासाठी या दुकानात लोकांची धावपळ सुरू आहे.

स्टोव्हचा रंजक इतिहास

स्टोव्हचा शोध 1892 मध्ये स्वीडनच्या फान्झ विल्हेल्म लिंडक्विस्ट यांनी लावला. प्रायमस या नावाने जगभर प्रसिद्ध झालेल्या या प्रेशर स्टोव्हने स्वयंपाकघरात क्रांती घडवली होती. भारतात 1960 ते 1990 च्या दशकापर्यंत स्टोव्ह हे प्रत्येक घराचे अविभाज्य अंग होते. बर्नर, पिन आणि पंप हे शब्द त्या काळात घराघरात परिचयाचे होते. गॅस सिलिंडरच्या आगमनाने स्टोव्ह अडगळीत गेले होते. मात्र, आज पुन्हा एकदा अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे आलेल्या संकटकाळात हाच जुना मित्र मदतीला धावून आला आहे.

हॉटेल व्यावसायिक म्हणतात....

गेल्या अनेक दिवसांपासून सिलिंडर मिळणे कठीण झाले आहे. कोळसा महागला असून, इलेक्ट्रीक शेगड्यांचाही बाजारात तुटवडा आहे. शेवटी नाईलाजास्तव 10 वर्षांपासून अडगळीत पडलेला जुना स्टोव्ह बाहेर काढला. हॉटेल चालवायचे असेल तर आता हाच एकमेव आधार उरला आहे.

- अण्णा चोपडे, हॉटेलचालक, निगडी

सध्याच्या परिस्थितीत हॉटेल व्यवसाय टिकवणे कठीण झाले आहे. गॅसटंचाईमुळे ग््रााहकांना वेळेवर सेवा देणे शक्य होत नाही. त्यामुळेच शनिवार पेठेत येऊन आमचा जुना स्टोव्ह दुरुस्त करून घेत आहोत, जेणेकरून कामात खंड पडणार नाही.

- धनश्री चोपडे, हॉटेल व्यावसायिक

युद्धाच्या परिणामांमुळे गेल्या काही दिवसांपासून आमच्याकडे स्टोव्ह दुरुस्तीसाठी प्रचंड गर्दी होत आहे. आमची तिसरी पिढी हा व्यवसाय करत असून दुकानाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. अडगळीत पडलेले 20 ते 30 वर्षे जुने स्टोव्ह लोक घेऊन येत आहेत. पुण्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आमच्याकडे स्टोव्हदुरुस्तीसाठी विश्वासाने येत आहेत.

- राहुल वारे, मालक, वारे अँड सन्स, शनिवार पेठ

मध्यमवर्गीय कुटुंबासाठी गॅसटंचाई हा मोठा चिंतेचा विषय आहे. गॅस सिलिंडर वेळेवर मिळाला नाही, तर घरात स्वयंपाक कसा होणार? त्यामुळे खबरदारी म्हणून घरातील जुना स्टोव्हदुरुस्त करून ठेवत आहे. आज पुन्हा जुन्या दिवसांची आठवण होत आहे.

- राम दहाड, स्थानिक नागरिक, शनिवार पेठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT