मंचर: जवळे येथे गॅसगळती होऊन घराला आग लागली. या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यात शेतमजुरी करणार्या कुटुंबाचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी (दि. 13) रात्री घडली. या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जवळे येथील अनिल भरत गावडे, भरत कृष्णा गावडे यांच्या घरातील गॅस संपल्याने त्यांनी दुसरी गॅस सिलिंडरची टाकी आणली होती. रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी दुसरी टाकी जोडली व गॅस पेटविला. मात्र, त्या वेळी रेग्युलेटरजवळ गॅस लिकेज झाला. त्यामुळे आगीचा भडका उडाला आणि आग लागली. घर कौलारू आणि लाकडाचे असल्याने ही आग तासभर सुरू होती.(Latest Pune News)
या आगीत घरातील टीव्ही, गॅस, धान्य, कपडे, इलेक्ट्रिक वस्तू, मुलांची वह्या-पुस्तके आदी विविध वस्तू जळून खाक झाल्या आहेत. घराचेही पूर्ण नुकसान झाले आहे. दरम्यान, स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती पोलिस पाटील रवींद्र लोखंडे यांनी पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरद घोडके यांना दिली.
भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. हे कुटुंब मोलमजुरी करणारे असून, या आगीमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना शासनाने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी खालकर यांनी केली.