पुणे

पिंपरी : कचरा भरणार महापालिकेचे वीज बिल !

अमृता चौगुले

मिलिंद कांबळे

पिंपरी(पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरवासीयांकडून जमा होणार्‍या कचर्‍यापासून पालिकेने वीजनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. यातून निर्माण होणार्‍या विजेमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वीज बिल अंदाजे निम्म्याने कमी होणार असून, वीज बिलापोटीच्या रकमेतही मोठी बचत होणार आहे. ही आर्थिक बचत एक नव्हे तर, तब्बल 21 वर्षे होणार आहे. हे वाचून तुम्हांला आश्चर्य वाटेल; मात्र हे अगदी खरे आहे. पालिकेने मोशी कचरा डेपोत जमा होणार्‍या 700 टन सुक्या कचर्‍यापासून वीज निर्मितीचा 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्प उभारला आहे.

तेथे कचर्‍यापासून प्रतितास 14 मेगावॅट वीज तयार केली जाणार आहे. ही वीज पालिकेस 5 रूपये प्रति युनिट दराने उपलब्ध होणार आहे. ही उपलब्ध वीज निगडी, सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र, रावेत येथील अशुद्ध उपसा पाणी केंद्र आणि शहरातील विविध 11 मैला सांडपाणी जलशुद्धीकरण केंद्रांसाठी वापरण्यात येणार आहे.

कचर्‍यातून वर्षभरात तब्बल 10 कोटी किलो वॅट वीज तयार होणार आहे. ती वीज भोसरीतील इंद्रायणीनगर येथील महावितरणच्या क्रमांक दोनच्या वीज उपकेंद्राच्या 22 के.व्ही. ग्रीडला जोडली आहे. 21 वर्षे पाच रूपये प्रती युनिट दराने ही वीज पालिकेस मिळणार असल्याने पालिकेच्या एकूण वीज बिलात सुमारे 40 टक्के बचत होईल.

तीनशे कोटींचा प्रकल्प

हा प्रकल्प पालिकेने पब्लिक प्रायव्हेट पार्टनशीप (डीबीओटी) तत्वावर साकारला आहे. त्यासाठी 1 हजार टन क्षमतेता मटेरिअल रिकव्हरी फॅसिसिटी (एआरएफ) उभारण्यात आला आहे. प्रकल्पासाठी 300 कोटींचा खर्च झाला आहे. पालिकेने 50 कोटींचे अनुदान दिले आहे. वीज निर्मितीसाठी जपानी कंपनीचे तंत्रज्ञान वापरले आहे. कचर्‍याची विल्हेवाट लावल्याबद्दल प्रति टनासाठी टीपींग चार्ज म्हणून पालिका ठेकेदारास 504 रूपये देणार आहे.

वायू प्रदूषण न होण्याची दक्षता

प्रकल्पात सुका कचरा जाळल्याने वायू प्रदूषण होऊ नये म्हणून उंच चिमणी उभारण्यात आली आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी धूर नियंत्रणासाठी प्रकल्पाचा सुमारे 40 टक्के खर्च त्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे कमीतकमी प्रदूषण होईल. या ठिकाणी वायू प्रदूषण फलक लावल्याने वायू व ध्वनी प्रदूषण पातळी समजेल. त्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा वॉच असेल. तसेच, येथे चिखली मैला सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात प्रकिया केलेले 5 एमएलडी पाणी वापरले जाणार असून, पाण्याचीही बचत होणार आहे.

महापालिकेची मोठी आर्थिक बचत

  • महापालिकेची विविध कार्यालये, शाळा, शहरभरातील विविध प्रकल्प व पथदिव्यांसाठी दररोज सरासरी 53 मेगा वॅट वीज लागते. महावितरणकडून 7.50 रुपये युनिट दराने वीज घेतली जाते. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून दररोज 5 रुपये युनिट दराने मिळणार्‍या 14 पैकी 12 मेगा वॅट वीजपुरवठ्यामुळे पालिकेची वीज बिलात मोठी घट होईल.
  • कचर्‍यातून वर्षाकाठी एकूण 8 कोटी 60 लाख किलो वॅट वीज पालिकेस 5 रुपये प्रती युनिट दराने मिळणार आहे. त्याचे महावितरणाच्या 7.50 रुपये प्रती युनिट दराने बिल 64 कोटी रुपये होते. तर, 5 रुपये दराने 43 कोटी रुपये. एकूण 21 कोटी रुपयांची अशी 39 टक्के बचत होते. ती पुढील 21 वर्षे कायम राहणार आहे.
  • महावितरणाकडून भविष्यात वारंवार वीजदरात वाढ होत राहणार आहे. ती भाववाढ लक्षात घेतल्यास पालिकेच्या वीज बिलातील बचतीमध्ये आणखी भर पडू शकेल.

राज्यातील पहिलाच प्रकल्प

कचर्‍यापासून वीज निर्मितीचे प्रकल्प देशात दिल्ली, चंदीगड, जबलपूर, हैदराबाद येथे सुरू आहेत. महाराष्ट्र राज्यात पिंपरी-चिंचवड पालिकेचा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे दररोज 700 टन कचर्‍याची विल्हेवाट लागणार आहे. हा पर्यावणपूरक प्रकल्प असून, कचरा साचून त्याचे डोंगर तयार होण्याचा प्रश्न मिटेल. तसेच, पालिकेच्या वीज बिलात मोठी आर्थिक बचत होणार आहे. सध्या 1.4 मेगा वॅट वीज तयार होत आहे. पुढील 10 दिवसांत पूर्ण क्षमतेने प्रत्येक तासाला 14 मेगा वॅट वीज निर्मिती तयार करण्यात येईल, असे पालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT