पुणे: राज्याच्या नगरविकास विभागाने गुरुवारी (दि. 12) नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला. या प्रक्रियेला 17 जूनपासून सुरुवात होणार असून, ऑगस्ट अखेर किंवा 1 सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रभाग रचनेसाठी ’गुगल मॅप’वर प्रभागांचे नकाशे तयार करण्यात येणार असून, नकाशावर दाखवलेली प्रभागांची हद्द प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पडताळली जाणार आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी हे वेळापत्रक घोषित केले. (Latest Pune News)
काही दिवसांपूर्वीच नगरविकास विभागाने महानगरपालिकांनंतर नगरपरिषद व नगरपंचायतींसाठीही प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कार्यक्रमाची उत्सुकता निर्माण झाली होती. या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकार्यांना अधिकार देण्यात आले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही महत्त्वाची मानली जात आहे.
नगरपरिषद, नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्यांकडून प्रगणक गटांची 16 जूनपर्यंत मांडणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. 17 ते 18 जून दरम्यान प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करावे लागेल. जनगणनेची माहिती तपासणी, स्थळ पाहणी, गुगलमॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे, नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागांच्या हद्दी जागेवर जाऊन तपासणी करणे, प्रारुप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षर्या करणे यासारखी विविध कामे 17 जून ते एक जुलै दरम्यान मुख्याधिकार्यांना करावी लागणार आहेत.
नगरपंचायत, नगरपरिषदांच्या मुख्याधिकार्यांकडून प्रभाग रचनेच्या प्रारुपाचा प्रस्ताव चार ते आठ जुलै दरम्यान निवडणूक आयोगास पाठवावा लागणार आहे. राज्य निवडणूक आयोग किंवा आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकार्यामार्फत प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येईल.
त्यानंतर प्रभाग रचनेचे प्रारुप प्रसिद्ध झाल्यानंतर 15 ते 21 जुलैदरम्यान त्यावर नागरिकांसह राजकीय पक्षांना हरकती व सूचना नोंदविता येतील. राजकीय पक्षांकडून आलेल्या हरकतींवर 22 ते 31 जुलै दरम्यान जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकार्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्याकडून त्याबाबत सुनावणी घेण्यात येईल.
‘एक सप्टेंबर’पर्यंत अंतिम प्रभाग रचना
सुनावणीनंतर हरकती, सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन मुख्याधिकार्यांकडून सात ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगाकडे अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी पाठविली जाईल. राज्य निवडणूक आयुक्तांना 22 ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करावी लागणार आहे. अशा स्वरुपाचे प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून आता कार्यवाही सुरू केली जाणार आहे.