पुणे/पिंपरी: पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागरचनेच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दि. 4 सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच महापालिका निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी चारसदस्यीय प्रभागरचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. मात्र, किती कालावधीत ही रचना करून ती जाहीर करायची, हे स्पष्ट केले नव्हते. गुरुवारी यासंबंधीचे सविस्तर आदेश शासनाने महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार राज्यातील पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड या अ, ब, क दर्जाच्या महापालिकांच्या प्रभागरचना तयार करण्याचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. (Latest Pune News)
शासनाने दिलेल्या आदेशानुसार दि. 11 ते 16 जून या कालावधीत महापालिका आयुक्तांनी प्रगणक गटाची मांडणी करायची आहे. त्यानंतर प्रत्यक्षात प्रारूप प्रभागरचनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यानुसार दि. 17 व 18 जूनला
जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे, दि. 19 ते 23 या कालावधीत स्थळपाहणी, दि. 23 ते 24 जून या कालावधीत गुगल मॅपवर प्रभागांचे नकाशे तयार करणे, दि. 1 ते 3 जुलै या कालावधीत नकाशावर निश्चित केलेल्या हद्दी जागेवर जाऊन तपासणे, दि. 4 ते 7 जुलैदरम्यान प्रारूप प्रभागरचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षरी घेणे.
त्यानंतर महापालिका आयुक्तांनी दि. 8 ते 10 जुलैदरम्यान प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला पाठविला जाणार आहे. निवडणूक आयोगाकडून या प्रारूप प्रभागरचनेला मंजुरी दिल्यानंतर दि. 22 ते 31 जुलैदरम्यान ही प्रारूप रचना जाहीर करून त्यावर हरकती-सूचना मागविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
त्यानंतर दि. 1 ते 11 ऑगस्टदरम्यानच्या कालावधीत या हरकती-सूचनांवर शासनाने नियुक्त केलेला अधिकारी सुनावणी घेणार आहे. सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकार्यांनी अंतिम केलेली प्रभागरचना दि. 12 ते 18 ऑगस्ट या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम मंजुरीसाठी जाणार आहे.
पुन्हा नियुक्त केलेल्या अधिकार्याच्या शिफारशीनुसार अंतिम प्रभागरचनेला राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी मंजुरी दिल्याचे महापालिका आयुक्तांना कळविले जाणार आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त ही अंतिम प्रभागरचना दि. 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत अधिसूचनेद्वारे जाहीर करणार आहेत.
दिवाळीआधी आचारसंहिता, नंतर मतदान
प्रभागरचनेच्या वेळापत्रकानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे. त्यानंतर लगेचच आरक्षण सोडत होईल. त्यानंतर पुढच्या काळात कधीही आचारसंहिता जाहीर होऊ शकते. मात्र, आचारसंहितेचा 35 ते 45 दिवसांचा कालावधी लक्षात घेता दिवाळीआधी आचारसंहिता जाहीर होऊन दिवाळीनंतरच मतदानाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
अंतिम प्रभागरचनेनंतर आरक्षण सोडत
अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यानुसार महिला, इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती व जमाती यांची आरक्षणे काढण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणूक जाहीर करण्याचा मार्ग मोकळा होईल.
पिंपरी-चिंचवड शहरात चार सदस्यीय 32 प्रभाग रचना तयार करण्यासाठी प्राथमिक कामकाज सुरू करण्यात आले आहे. प्रभागरचना तयार करताना चिखली-तळवडेपासून सुरुवात करून सांगवी येथे समाप्ती केली जाईल. त्या क्रमाने प्रभागांना क्रमांक दिले जातील. राज्य शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रभागरचना तयार केली जाईल. त्या दृष्टीने मनुष्यबळ नेमले जाणार आहे. आयुक्त नसल्याने त्यांच्यासोबत अद्याप चर्चा झालेली नाही.
- अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, असे महापालिका