शिरुर : पुढारी वृत्तसेवा
रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीस पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीकडून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील हद्दीतून चोरीस गेलेल्या २२ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या असून, २२ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्यांची नावे सुनिल आनंदराव मोरे, अजयसिंग कुंदनसिंग बोरा (दोघेही रा. रांजणगाव), विशाल खंडु पवार (रा. वडगाव सावता, अहमदनगर), पवन तेजराव काकड, आकाश भाकरे (दोघेही रा. मोरगाव भाकरे, जि. अकोला), प्रविण एकनाथ गांडाळ (रा. सावरचोळ, मेंगाळवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) आणि रमेश भीमराव पवार (रा. लिंगनुर, ता. मिरज, जि. सांगली) अशी आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी परिसरामध्ये लॉकडाऊन काळानंतर मोटारसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार मांडगे यांनी तपास पथक नेमले होते.
या पथकाने रांजणगाव एमआयडीसी परिसरात साध्या वेषात वेळोवेळी सापळा लावून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपास पथकास मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी रांजणगाव येथील सुनिल आनंदराव मोरे यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने व त्याचा साथीदार अजयसिंग कुंदनसिंग बोरा याने रांजणगाव, शिकापुर परिसरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. या दोघांकडुन 8 मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच विशाल खंडु पवार हा देखील रांजणगाव परिसरात मोटार सायकल चोरी करत असल्याची माहिती मिळाली असता त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडुन 7 मोटारसायकल जप्त केल्या. यासोबतच पवन तेजराव काकड, आकाश भाकरे यांचेकडुन 2 मोटारसायकल तसेच प्रविण एकनाथ गांडाळ याच्याकडुन 2 मोटारसायकल आणि रमेश भिमराव पवार यांच्याकडुन 4 मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत.
रांजणगाव एमआयडीसी, शिक्रापुर, शिरुर, नारायणगाव, कोतवाली पो.स्टे. अहमदनगर व सोलापुर पोलीस ठाणे हद्दीतील 22 मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या असुन त्यांचेकडुन एकुण 22 गुन्हे उघडकीस आले आहेत. या सर्वांना शिरुर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, वैभव मोरे, विजय शिंदे, उमेश कुतवळ, रघुनाथ हाळनोर, विलास आंबेकर, संतोष औटी, विजय सरजिने यांच्या पथकाने केला.