पुणे

Pune crime news : महावितरणचे कर्मचारी सांगून फसवणारी टोळी पकडली

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'तुमच्याकडे लावलेले वीज मीटर संथ झाले आहे. कनेक्शन दिल्यापासून तुम्हाला लाखो रुपयांचे बिल भरावे लागेल. तुमचे वीज मीटर बदलून देतो व त्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल' अशी बतावणी करून तसेच महावितरणचे कर्मचारी असल्याचे भासवून महावितरण व वीज ग्राहकांचे लाखो रुपयांचे नुकसान करणार्‍या टोळीचा चाकणमध्ये पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, चाकण परिसरात अज्ञात व्यक्ती महावितरणचे कर्मचारी असल्याची बतावणी करून वीज ग्राहकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याची कुणकुण महावितरणला लागली होती. या प्रकाराबाबतची मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी गंभीर दखल घेतली. त्यांच्या मार्गदर्शनात पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता युवराज जरग, राजगुरूनगर विभागाचे कार्यकारी अभियंता. राजेंद्र येडके, चाकणचे उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे, सहायक अभियंता अविनाश सावंत यांनी कर्मचार्‍यांसह संशयास्पद वीज मीटरची तपासणी सुरू केली. यामध्ये चाकण येथील नाणेकरवाडी, आंबेठाण रस्ता, माणिक चौक परिसरात काही ग्राहकांकडे वीज मीटर बदलले आहे. परंतु, त्याची महावितरणकडे त्यांची नोंद नाही किंवा जुने मीटर महावितरणकडे जमा केले नसल्याचे आढळून आले.

याबाबत संबंधित वीज ग्राहकांना विश्वासात घेत अधिक तपास केला असता परस्पर वीज मीटर बदलून देणारा आरोपी दयानंद पट्टेकर हा मीटर रीडिंग घेणार्‍या अलमदाद कॉम्प्युटर एजन्सीशी संबंधित असल्याचे उघड झाले. आरोपी पट्टेकर व अज्ञात तीन व्यक्तींनी महावितरणचे भरारी पथकाचे कर्मचारी असल्याचे भासवून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गेल्या ऑगस्ट महिन्यात तीन वीज ग्राहकांकडील वीज मीटर परस्पर बदलून दिले. यामध्ये महावितरणचे सुमारे 1 लाख 22 हजार 277 युनिटचे म्हणजे 13 लाख 28 हजार 270 रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी महावितरणकडून चाकण पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दयानंद पट्टेकर व तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT