पुणे: आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाचे नियोजन अधिक सुखकर करण्यासाठी एसटीच्या पुणे विभागाने कंबर कसली आहे. यंदा गणेशोत्सवासाठी पुणे विभागातून सोडण्यात येणाऱ्या तब्बल १७३ एसटीबसचे बुकिंग पूर्ण (फुल्ल) झाले आहे. यामध्ये १२० गाड्यांचे ग्रुप बुकिंग, तर ५३ गाड्यांचे वैयक्तिक आरक्षण पूर्ण झाले आहे.
होळी सणाप्रमाणेच दरवर्षी गणेशोत्सवासाठी पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. प्रवाशांची हीच अतिरिक्त सोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून दरवर्षी विशेष बस सोडल्या जातात. गेल्या वर्षी गणेशोत्सवासाठी पुणे विभागातून १७० जादा गाड्या धावल्या होत्या.
यंदा प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली असून, १७३ गाड्यांचे यशस्वी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरी, चिपळूणसह संपूर्ण कोकण भागात जाणाऱ्या प्रवाशांना गर्दीपासून मोठा दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असून, कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. प्रवाशांना ऐनवेळी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये आणि त्यांचा प्रवास सुरक्षित व वेळेत व्हावा, यासाठी आम्ही पूर्वमान्यतेनुसार नियोजन केले आहे. गेल्या वर्षी १७० गाड्या धावल्या होत्या, तर यंदा प्रवाशांच्या मागणीनुसार १७३ गाड्यांचे नियोजन पूर्ण झाले असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. प्रवाशांच्या गरजेनुसार पुढील काळात आवश्यकतेनुसार अतिरिक्त गाड्यांचाही विचार केला जाईल.कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग
कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण वेळेत पूर्ण झाल्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सच्या अवाजवी भाडेवाढीपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. एसटी महामंडळाच्या या सुटसुटीत नियोजनामुळे यंदाचा कोकणवासीयांचा गणेशोत्सवाचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होणार आहे.श्रेयस शेडगे, कोकण भागातील रहिवासी