Ganeshotsav Sound System Rules Pudhari
पुणे

Ganeshotsav Sound System Rules: ध्वनियंत्रणेबाबत चार टॉप, चार बेसवर ‘तह’; ८० टक्के मंडळांची तयारी

प्लाझ्मा, प्रेशर मिडला बहुतांश मंडळांचा नकार; चर्चेतून तोडगा काढण्याचे पोलिसांचे प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आगामी गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवात ध्वनियंत्रणेच्या वापराबाबत पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये चर्चेतून तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. ध्वनियंत्रणेत चार टॉप आणि चार बेस ठेवण्याच्या पर्यायाला सुमारे ८० टक्के गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे ध्वनियंत्रणेच्या मुद्द्यावर चार टॉप आणि चार बेस या पर्यायावर पोलिस आणि मंडळांमध्ये तडजोड होण्याची शक्यता आहे.

पोलिस प्रशासनाकडून सुरुवातीला मंडळांनी दोन टॉप आणि दोन बेस ध्वनियंत्रणा वापरावी, अशी भूमिका मांडण्यात आली होती. मात्र, गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी चार टॉप आणि चार बेसचा पर्याय सुचविला. आता या पर्यायावर देखील पोलिस चर्चा करून तोडगा काढणार असल्याची माहिती आहे.

गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्याची मागणी मंडळे आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मात्र, ध्वनिप्रदूषण आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ध्वनियंत्रणांना मोकळीक दिली जाणार नसल्याची भूमिका सुरुवातीपासूनच पोलिस प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

विशेषतः प्लाझ्मा आणि प्रेशर मिड यांसारख्या अतितीव्र आवाज निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर बंदी कायम ठेवण्यात येणार आहे.

या उपकरणांमुळे आवाजाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. या भूमिकेला गणेश मंडळांच्या प्रतिनिधींकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान, कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना किती त्रास होतो हे पडताळून पाहण्यासाठी, प्रेशर मिड आणि सामान्य साऊंड यांच्यातील फरक स्पष्ट करण्यासाठी गेल्या आठवड्यात पोलिस आयुक्तालयात प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी चार टॉप आणि दोन बेस असलेल्या ध्वनियंत्रणेसोबत दोन प्रेशर मीडचा आवाज समान पातळीवर ठेवून तुलना करण्यात आली.

या प्रात्यक्षिकांत प्रेशर मिडमधून निर्माण होणारा आवाज अत्यंत तीव्र आणि असह्य पातळीवर जात असल्याचे निदर्शनास आले. सामान्य ध्वनियंत्रणेच्या तुलनेत प्रेशर मीडचा आवाज अधिक तीव्र आणि त्रासदायक असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. त्यामुळे कर्णकर्कश आवाज निर्माण करणाऱ्या उपकरणांवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.

चर्चेतून अंतिम निर्णयाची शक्यता

ध्वनियंत्रणेच्या क्षमतेबाबत पोलिस आणि गणेश मंडळांच्या प्रतिनिधींमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून दोन टॉप आणि दोन बेसचा पर्याय मांडण्यात आला असला, तरी चार टॉप आणि चार बेस या पर्यायाला बहुतांश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यावर अंतिम सहमती होण्याची शक्यता आहे.

सुमारे ८० टक्के मंडळे चार टॉप आणि चार बेसच्या पर्यायाबाबत सकारात्मक असल्याने उर्वरित मंडळांशीही चर्चा करून सर्वमान्य तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी ध्वनीयंत्रणेबाबत स्पष्ट नियम आणि सर्वमान्य निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासनाचा भर उत्सवातील उत्साह कायम ठेवतानाच ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यावर आहे. त्यामुळे सामान्य ध्वनियंत्रणेचा मर्यादित वापर आणि अतितीव्र आवाज करणाऱ्या उपकरणांवर नियंत्रण, या दोन्ही बाबींचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत कारवाई

नुकतेच झालेल्या ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत देखील पोलिसांनी ध्वनियंत्रणेत चार टॉप आणि चार बेसच्यावरती साऊंड सिस्टिम लावलेल्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे एकप्रकारे पोलिसांकडूनसुद्धा चार टॉप आणि चार बेसला हिरवा कंदील असल्याचे दिसून येते, तर मिरवणुकीत प्लाझ्मा आणि प्रेशर मिडचा वापर करण्यात आलेल्या सहा साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच ‍आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११० पेक्षा अधिक ठिकाणी पोलिसांनी खटले भरले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT