यंदा एक तास आधीच निघणार विसर्जन मिरवणूक; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती File Photo
पुणे

Pune Visarjan Miravnuk: यंदा एक तास आधीच निघणार विसर्जन मिरवणूक; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ; मिरवणूक वेळेत संपविण्याचा गणेश मंडळांचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

Pune Visarjan Miravnuk Time

पुणे: पुण्यातील विसर्जन मिरवणूक शनिवारी (दि. 6) एक तास अगोदर सुरू होणार असून, यंदाही मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी काटेकोरपणे पावले उचलली आहेत. त्याला मानाच्या मंडळांसह इतर प्रमुख मंडळांनी सहकार्य करण्याची सहमती दर्शविली आहे.

मागील वर्षी सकाळी साडेदहा वाजता ही मिरवणूक सुरू झाली होती. यंदा सकाळी साडेनऊ वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सह पोलिस आयुक्त, अप्पर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, राजेश बनसोडे, मनोज पाटील, उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, निखिल पिंगळे आदी उपस्थित होते. (Latest Pune News)

शनिवारी (दि.6) सकाळी 9.30 वाजता मानाचा पहिला कसबा गणपती मंडईतील टिळक पुतळा परिसरात आगमन करेल. 9.30 वाजता पूजा संपवून कसबा गणपती मिरवणुकीस प्रारंभ करून तो बेलबाग चौकात पोहोचेल. 10.15 वाजता तेथून पुढे लक्ष्मी रोडवर मार्गस्थ होईल. यानंतर ठरलेल्या वेळापत्रकानुसार मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती सकाळी 10.30 वाजता बेलबाग चौकातून पुढे जाईल. मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती आरती करून 11 वाजता मार्गस्थ होईल.

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती व मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती दुपारी 12 वाजेपर्यंत बेलबाग चौकातून पुढे जातील, अशा प्रकारे सर्व मानाचे पाचही गणपती दुपारी 12 वाजेपर्यंत लक्ष्मी रोडवर मार्गस्थ होतील, असे नियोजन पोलिसांनी केले आहे. यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत महानगरपालिका गणपती व त्वेष्टा कासार गणपती मिरवणुकीत सामील होतील. दुपारी 4 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकात येऊन मुख्य मिरवणुकीत सहभागी होईल.

त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता जिलब्या मारुती गणपती, हुतात्मा बाबू गेनू गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती व अखिल मंडई मंडळ गणपती प्रवेश करतील. ही मंडळे रात्री 7 वाजेपर्यंत बेलबाग चौक सोडतील.

विद्युत रोषणाई असलेली मंडळे रात्री 7 नंतर मिरवणुकीत सामील होतील. लक्ष्मी रोड व शिवाजी रोडवरून येणारी सर्व मंडळे फक्त बेलबाग चौकातूनच मुख्य मिरवणुकीत प्रवेश करतील. मानाचा पहिला कसबा गणपती अलका टॉकीज चौक पार करेपर्यंत इतर कोणतेही मंडळ त्या चौकात प्रवेश करणार नाही, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

टिळक रस्त्यावरून जाणार्‍या मिरवणुकीसाठी नियमावली

टिळक रस्त्यावरून जाणार्‍या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी नियमावली तयार केली आहे. नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

...अशी आहे नियमावली

  • टिळक रस्त्यावरील वाहतूक सकाळी

  • सहा वाजल्यापासून बंद राहणार, मिरवणूक सकाळी सात वाजल्यापासून सुरू

  • मंडळांनी जेधे चौकात केव्हा येणार, याची माहिती स्वारगेट पोलिसांना द्यावी.

  • रात्रीच ट्रॅक्टर आदमबाग मशीद टिळक रोड, बाजीराव रोडला आणतात, त्यानंतर टॅक्टरवरच काम करतात. त्याचा अडथळा मागील मंडळांना होतो. त्यामुळे कोणतेही मंडळ थांबून राहणार नाही

  • विसर्जन नियमावलीबाबत टॅक्टरचालक, स्पीकर ऑपरेटर यांना माहिती देणे

  • पर्यायी चालक तयार ठेवा

  • टॅक्टर मेकॅनिक पूरम चौकात राखीव असणार

  • प्रथम येणार्‍यास प्रथमप्राधान्य राहणार

  • दोन मंडळांमध्ये अंतर नको

  • 12 छोटे-मोठे वॉचटॉवर असणार

  • जेधे चौक, पूरम चौकात ढोल-ताशाला बंदी, डीजेही या ठिकाणी वाजवता येणार नाही

  • मिरवणुकीमध्ये डीजे किंवा ढोल- ताशा पथक एकालाच परवानगी

  • जास्तीत जास्त दोन पथक, 60 सदस्य, एका पथकाला एकच आवर्तन

  • टिळक चौकात मिरवणूक संपल्यानंतर पथकातील सदस्य मिरवणुकीच्या उलट्या दिशेने येणार नाहीत.

  • पाच मिनिटांपेक्षा जास्तवेळ चौकात स्थिर वादन होणार नाही. प्रत्येक चौकातही डीजे पाच मिनिटांपेक्षा जास्त वाजणार नाही

  • मुख्य रस्त्यावर खाद्यपदार्थ विकण्यास मनाई

  • पूना हॉस्पिटल चौक या ठिकाणी विसर्जन हौदाची उभारणी करण्यात आली आहे.

  • मद्य विक्रीवर निर्बंध

...पोलिसांच्या अटी

  • टिळक पुतळा, मंडई ते बेलबाग चौक दरम्यान वाद्यवृंद वादनास मनाई. वादनाची सुरुवात बेलबाग चौकापासूनच.

  • मुख्य मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये अंतर राहणार नाही, कोणीही रांग सोडून प्रवेश करणार नाही.

  • अलका टॉकीज चौक पार केल्यानंतर ढोल- ताशा पथक सदस्यांनी परतीचा मार्ग मिरवणुकीच्या उलट दिशेने घेऊ नये.

  • कोणतेही ढोल- ताशा पथक स्थिर वादन करणार नाही.

  • प्रत्येक मंडळाला जास्तीत जास्त दोन ढोल- ताशा पथकांचीच परवानगी, एका पथकात 60 सदस्य.

  • डीजे किंवा ढोल-ताशा पथक - पैकी फक्त एकच मंडळासोबत असेल.

मंडळांकडून वेळ पाळण्याची हमी

पोलिसांनी सर्वानुमते विसर्जन मिरवणुकीसाठी आराखडाच तयार केला आहे. त्याला मानाच्या मंडळांसह प्रमुख गणेश मंडळांनी संमती दर्शविली असून, वेळ पाळण्याची हमी दिली आहे. त्यामुळे यंदा विसर्जन मिरवणूक वेळेत पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

जास्त वेळ थांबल्यास पोलिसांना जाणार अलर्ट

बेलबाग चौकातून मिरवणूक पुढे सरकताना मंडळ पुढे सरकते की जागेवरच थांबले आहे, याचे ट्रॅकींग केले जाणार आहे. मंडळ जास्त काळ रस्त्यावर थांबलेले आढळल्यास पोलिस यंत्रणेकडून त्यांना सूचित करण्यात येणार आहे, याचे अलर्ट पोलिस अधिकार्‍यांच्या मोबाईलवर मिळत राहणार आहे.

लेझर लाइटवर बंदी

लोहगाव विमानतळावर रात्री वेगवेगळ्या एअर लाइन्सची व भारतीय वायू सेनेची विमाने, हेलिकॉप्टर उतरत असतात व उड्डाण करत असताना रात्रीच्या वेळी त्यांना लेझर लाइटचा अडथळा निर्माण होतो. विसर्जन मिरवणुकीत लेझर लाइट प्रकाशित होत असतात, याही वर्षी या लेझर लाइट करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या लेझर लाइटमुळे नागरिकांच्या डोळ्याला त्रास झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर गेल्यावर्षी लेझर लायटिंग वापरावर मंडळांना बंदी घालण्यात आली होती. यावर्षीही ही बंदी कायम राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT