

पुणे: राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण संपवले आहे. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा घेतलेला निर्णय हा ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा गळा घोटणारा असल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली. तसेच, आंदोलन समाप्त करताना जाहीर केलेला अध्यादेश हा संपूर्णपणे बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी म्हटले.
हाके यांनी बुधवारी गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे काळ्या फिती लावून आंदोलन केले. त्या वेळी ते माध्यमांशी बोलत होते. या वेळी मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (Latest Pune News)
हाके म्हणाले , गावागावांत तपासणी करून आरक्षण दिले जाईल, असे सरकार सांगत आहे. परंतु, प्रमाणपत्र देताना कसलीही तपासणी केली जाणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर संक्रांत येणार आहे.
विखे-पाटील हे या विषयाचा काहीही अभ्यास न करता निर्णय घेत आहेत. आपल्या जिल्ह्यात किती ओबीसी, किती मराठे, किती कुणबी आहेत, याचीही त्यांना माहिती नाही. अशा परिस्थितीत घेतलेला हा निर्णय चुकीचा आणि अन्यायकारक आहे.
सरकारने या अध्यादेशामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार नाही, हे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान हाके यांनी दिले. शासन निर्णय आम्हाला जेवढा समजतो त्यानुसार ओबीसी आरक्षण संपले आहे. पुढच्या दरवाज्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, म्हणून मागच्या दरवाज्यातून देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. ओबीसी समाजाची संघर्ष यात्रा सुरू करणार असून, तिची सुरुवात मराठवाड्यातून करण्यात येणार असल्याचेही हाके यांनी सांगितले.