पुणे: घरगुती दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर गणेश मंडळांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी गुरुवारी (दि. 28) मध्यवस्तीतील गणेश मंडळांकडे धाव घेतली. सायंकाळी जोरदार पाऊस सुरू असतानाही गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता. एका हातात छत्री आणि दुसर्या हातात मुलांचा हात धरून अनेक कुटुंबे देखावे पाहायला आल्याचे चित्र दिसले.
मंडईतील बाबू गेनू गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ, दगडूशेठ हलवाई गणपती यांसारख्या प्रसिद्ध मंडळांच्या परिसरात गुरुवारी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. बुधवारच्या तुलनेत गर्दी थोडी कमी असली, तरी गणेशभक्तांचा उत्साह मात्र कायम होता. पावसामुळे अनेक जण छत्र्या घेऊनच देखावे पाहत होते. अनेक तरुण-तरुणी, कुटुंबे पावसातही फोटो आणि सेल्फी घेण्यात मग्न होती. (Latest Pune News)
पावसातही फोटोची क्रेझ
गणेश मंडळांच्या आकर्षक सजावटी आणि देखाव्यांनी पुणेकरांना भुरळ घातली आहे. जोरदार पाऊस सुरू असतानाही अनेक जण आपल्या मोबाईलमध्ये हे क्षण टिपण्यासाठी धडपडत होते. छत्र्यांच्या खाली उभे राहून सेल्फी काढणे, मित्र-मैत्रिणींसोबत ग्रुप फोटो घेणे, असे द़ृश्य ठिकठिकाणी दिसले.
खाऊ गल्लीत गर्दी
देखावे पाहत अनेक तास पायी चालल्यानंतर अनेकांना भूक लागली. त्यामुळे रात्री साडेआठ, नऊनंतर बहुतांश भाविकांनी खाऊ गल्ली, हॉटेल आणि रेस्टॉरंटकडे मोर्चा वळविला. कुटुंबासोबत रात्रीच्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी खाऊगल्लीत, हॉटेलांमध्ये गर्दी जमली होती. वडापाव, मिसळ, भजीसारख्या पदार्थांचा आस्वाद घेताना अनेक जण दिसले.
पोलिस- मेट्रो अधिकार्यांकडून गर्दी नियंत्रणात
मंडई मेट्रो स्थानकाबाहेर मोठी गर्दी होत असते, ती नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे होता. पोलिसांसोबतच मेट्रोचे अधिकारी आणि सुरक्षा रक्षकही येथे दिसले. गर्दीमुळे कोणालाही अडचण येऊ नये, यासाठी ते काळजी घेत होते.
दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केल्यानंतर लगेचच देखावे पाहण्यासाठी बाहेर पडलो. सायंकाळी पाऊस खूप होता, पण त्यामुळे आमचा उत्साह कमी झाला नाही. प्रत्येक वर्षी आम्ही दगडूशेठ गणपती आणि मंडईतील बाप्पाचे दर्शन घेतो. या वर्षीही पावसामुळे थोडी गैरसोय झाली, पण देखावे पाहण्याचा आनंद खूप वेगळा आहे. बाप्पाच्या दर्शनाने मन शांत होते.- आनंद पाठक, देखावे पाहायला आलेले नागरिक