पुणे: ढोल-ताशांचा निनाद, आकर्षक रोषणाई, भव्य मंडप अन् कल्पक देखाव्यांना मिळणारा अंतिम साज... अशा उत्साही वातावरणात पुण्यनगरी गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. कुठे इतिहासाला उजाळा, कुठे जिवंत देखाव्यांतून प्रसंगांची मांडणी, तर कुठे सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या संकल्पना आकार घेत आहेत. या उत्साहाला आणखी उंची देण्यासाठी 'पुढारी वृत्तपत्र समूह' आणि 'पुनीत बालन ग्रुप' यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही 'गणाधीश नवोन्मेष स्पर्धा' रंगणार आहे. उत्कृष्ट, ऐतिहासिक, जिवंत व सामाजिक देखाव्यांसह यंदा उपनगरांतील मंडळांच्या कल्पक देखाव्यांनाही हक्काचे व्यासपीठ मिळणार असल्याने मंडळांमध्ये कल्पकता, नावीन्य आणि विधायकतेची चुरस पाहायला मिळणार आहे.
वेगवेगळ्या गटांत होणाऱ्या या स्पर्धेचा तपशील पुढीलप्रमाणे:
गट पहिला : उत्कृष्ट देखावा
गणेशोत्सवातील बदलत्या प्रवाहाचे प्रतिबिंब या गटातून पाहायला मिळेल. विषयाची नावीन्यपूर्ण निवड, कल्पक मांडणी, नेत्रदीपक सादरीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या बाबी महत्त्वाच्या ठरतील. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), थ्रीडी तंत्रज्ञान, प्रकाशयोजना, ध्वनी तसेच अन्य तांत्रिक प्रयोगांचा आशयपूर्ण वापर करून प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणाऱ्या देखाव्यांना या गटात विशेष महत्त्व असेल. केवळ भव्यतेपेक्षा कल्पकता आणि परिणामकारकता हा केंद्रबिंदू असेल.
या गटातील पहिले पारितोषिक ३१ हजार रुपये, दुसरे पारितोषिक २१ हजार रुपये आणि तिसरे पारितोषिक ११ हजार रुपये असेल. तसेच, प्रत्येकी पाच हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिकेही त्यात असतील.
गट दुसरा : ऐतिहासिक देखावा
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड-किल्ले, स्वराज्याचा लढा, स्वातंत्र्य चळवळ, महापुरुषांचे कार्य आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या देखाव्यांचा या गटात समावेश असेल. इतिहासातील घटना केवळ हुबेहूब उभ्या करण्याऐवजी त्यामागील विचार आणि प्रेरणा नव्या पिढीपर्यंत किती प्रभावीपणे पोहोचविली जाते, यालाही महत्त्व असेल. ऐतिहासिक अचूकता, संशोधन आणि प्रभावी मांडणी ही या गटाची वैशिष्ट्ये असतील.
या गटातील पहिले पारितोषिक ३१ हजार रुपये, दुसरे पारितोषिक २१ हजार रुपये आणि तिसरे पारितोषिक ११ हजार रुपये असेल. तसेच, प्रत्येकी पाच हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिकेही त्यात असतील.
गट तिसरा : जिवंत देखावा (प्रसंग नाट्य)
स्थिर देखाव्यापेक्षा प्रत्यक्ष कलाकारांच्या अभिनयातून एखादी कथा, घटना किंवा संदेश प्रेक्षकांसमोर उलगडणे हे या गटाचे वैशिष्ट्य असेल. ऐतिहासिक, पौराणिक तसेच सामाजिक विषयांवर प्रसंग नाट्य सादर करता येईल. कलाकारांचा अभिनय, संवाद, वेशभूषा, नेपथ्य, प्रसंगाची बांधणी आणि अल्पावधीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारा आशय या बाबींवर भर असेल. कलेतून प्रबोधन आणि मनोरंजनाचा मेळ साधणारे सादरीकरण येथे महत्त्वाचे ठरेल.
या गटातील पहिले पारितोषिक ३१ हजार रुपये, दुसरे पारितोषिक २१ हजार रुपये आणि तिसरे पारितोषिक ११ हजार रुपये असेल. तसेच, प्रत्येकी पाच हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिकेही त्यात असतील.
गट चौथा : सामाजिक देखावा
गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा उपयोग सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी करणाऱ्या मंडळांसाठी हा गट असेल. महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, पाणीबचत, वाहतूक शिस्त, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता यांसारख्या समकालीन प्रश्नांवर भाष्य करता येईल. समस्या मांडण्याबरोबरच त्यावर उपाय किंवा सकारात्मक संदेश देणाऱ्या देखाव्यांना महत्त्व असेल. 'उत्सवाबरोबरच सामाजिक भान' हा या गटाचा मुख्य हेतू राहील.
या गटातील पहिले पारितोषिक ३१ हजार रुपये, दुसरे पारितोषिक २१ हजार रुपये आणि तिसरे पारितोषिक ११ हजार रुपये असेल. तसेच, प्रत्येकी पाच हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिकेही त्यात असतील.
गट पाचवा : उपनगरांतील देखावे
पुण्याच्या मध्यवर्ती भागासोबतच उपनगरांमध्येही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि कल्पकतेने साजरा केला जातो. आकर्षक सजावट, नावीन्यपूर्ण संकल्पना आणि सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांसाठी उपनगरांतील मंडळांचे कार्यकर्ते वर्षभर मेहनत घेतात. त्यांच्या या कल्पकतेला प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि त्यांच्या कार्याला हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने यंदा 'उपनगरांतील देखावे' हा स्वतंत्र गट स्पर्धेत समाविष्ट करण्यात आला आहे. या माध्यमातून उपनगरांतील मंडळांची कला, कल्पकता आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या गटातील पहिले पारितोषिक ३१ हजार रुपये, दुसरे पारितोषिक २१ हजार रुपये आणि तिसरे पारितोषिक ११ हजार रुपये असेल. तसेच, प्रत्येकी पाच हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिकेही त्यात असतील.
पारितोषिके किती अन् किती रकमेची?
उत्कृष्ट देखावा, ऐतिहासिक देखावा, जिवंत देखावा (प्रसंग नाट्य), सामाजिक देखावा आणि उपनगरांतील देखावे या पाच गटांतील स्पर्धांसाठी पहिले पारितोषिक ३१ हजार रुपये, दुसरे पारितोषिक २१ हजार रुपये आणि तिसरे पारितोषिक ११ हजार रुपये. तसेच, प्रत्येकी पाच हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके.
'गणाधीश नवोन्मेष स्पर्धा' कशासाठी?
सांघिक भावनेला, कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट देखावा स्पर्धा - सांघिकरीत्या काम करून परिणामकारक देखावा उभा करणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या आणि देखाव्यातून कलात्मक आविष्कार साकारणाऱ्या कलाकारांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी ही स्पर्धा आहे. त्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या नव्या पिढीलाही विशेषत्वाने प्रोत्साहित केले जाईल.
स्पर्धेतील गट कोणकोणते?
गट पहिला : उत्कृष्ट देखावा
गट दुसरा : ऐतिहासिक देखावा
गट तिसरा : जिवंत देखावा (प्रसंग नाट्य)
गट चौथा : सामाजिक देखावा
गट पाचवा : उपनगरांतील देखावे
असा भरा अर्ज!
मंडळांसाठी गुगल फॉर्म आहे. मंडळांनी https:///forms.gle/YMjs9qUaGoQr32Xs8 या लिंकवरील गुगल फॉर्म भरायचा आहे. सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करूनही तुम्ही अर्ज भरू शकता. फॉर्म भरण्याचा अखेरचा दिनांक १२ सप्टेंबर २०२६ आहे. या स्पर्धेबाबत आणखी माहिती हवी असल्यास कृपया ९८२३८७६७६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.