पुणे: अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेदरम्यान मुलींसाठी विशेष प्रवेश फेरीचे आयोजन केले असून, संबंधित फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या विशेष फेरीअंतर्गत नव्याने अर्ज करणाऱ्या तसेच अर्जामध्ये दुरुस्ती करू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना १० आणि ११ जुलै रोजी अर्ज नोंदणी, भाग-१ मधील दुरुस्ती, पसंतिक्रम भरणे आणि अर्ज लॉक करण्याची संधी देण्यात आली आहे.
या फेरीसाठी १२ जुलै रोजी अलॉटमेंट प्रक्रिया पार पडणार असून, १३ जुलै रोजी महाविद्यालय वाटपाची यादी आणि कटऑफ जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १३ व १४ जुलै रोजी विद्यार्थिनींना प्रवेश निश्चित करणे, नकार देणे किंवा प्रवेश रद्द करण्याची सुविधा उपलब्ध राहील.
याचबरोबर १४ जुलै रोजी पुढील विशेष प्रवेश फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असून १५ जुलैपासून राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नियमित अध्यापन सुरू होणार आहे. विशेष फेरीनंतर उर्वरित रिक्त जागांची यादी १६ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्यातील ९ हाजर ६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी १० लाख ८ हजार ९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. विशेष फेरी-१ साठी ४ लाख ८४ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
त्यापैकी ३ लाख ९२ हजार ६९३ विद्यार्थ्यांना ३ जुलै रोजी महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले. ७ जुलैपर्यंत ३ लाख २४ हजार १०२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, त्यामध्ये ३ लाख १२ हजार ९८३ प्रवेश कॅपअंतर्गत, तर ११ हजार ११९ प्रवेश इन-हाऊस, व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्यातून झाले आहेत. संबंधित फेरीतून प्रवेश घेण्यासाठी आज दि. 8 जुलै सांयकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.