पुणे: अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विशेष फेरी-३ अंतर्गत राज्यभरातील १ लाख ७ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी दि. २२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित केला आहे. यामध्ये कॅपअंतर्गत ९६ हजार ५६७, तर इनहाउस, व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्यातून १० हजार ९०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
राज्यातील ९ हजार ६९८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून, आत्तापर्यंत १५ लाख १८ हजार ९७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १२ लाख ६० हजार ८९० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
नियमित तीन फेऱ्या आणि विशेष दोन फेऱ्या संपल्यानंतर प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विशेष फेरी-३ मध्ये १ लाख ६५ हजार १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी १ लाख १२ हजार ८८० विद्यार्थ्यांना दि. २० जुलै रोजी महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर दि. २२ जुलैपर्यंत १ लाख ७ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले.
नियमित तीन फेऱ्या आणि विशेष तीन फेऱ्या संपल्यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी-४ ही २४ जुलै २०२६ पासून सुरू होणार आहे. याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष फेरीचे वेळापत्रक
दि. २४ जुलै ते २६ जुलै नवीन नोंदणी, अर्जदुरुस्ती व पसंतीक्रम नोंदविणे.
दि. २७ जुलै - अलॉटमेंट प्रोसेस
दि. २८ जुलै - महाविद्यालय वाटप प्रक्रिया.
दि. २८ ते २९ जुलै - महाविद्यालय प्रवेश निश्चित करणे किंवा रद्द करणे.
दि. २९ ते ३० जुलै - कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रशासकीय कामकाजासाठी राखीव.
दि. ३१ जुलै - पुढील फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर.
विभागनिहाय विशेष फेरी-३ मधील निश्चित प्रवेश
अमरावती - ९,७३२
छ. संभाजीनगर - १३,०८०
कोल्हापूर - ८,६५४
लातूर - ६,२१३
मुंबई - ३१,१७८
नागपूर - १०,६४०
नाशिक - ११,५३७
पुणे - १६,४५८
एकूण - १०,७,४९२