

देहूचे जगद्गुरू तुकोबाराय भवसागरातील दीपस्तंभ आहेत. हे खरे असले तरी हा दीपस्तंभ केवळ मराठी संस्कृतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. देशभर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूत कीर्तन, भजन, तुकाराम बीज सोहळे संपन्न होत आहेत. आंध्र प्रदेश, पं. बंगाल, गुजरात या राज्यांत तुकोबांच्या अभंगांनी तरुणाई झपाटून गेली आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका तामिळनाडूच्या भारतरत्न एम. एस. सुब्बुलक्ष्मी तुकोबारायांचा प्रसिद्ध ‘सुंदर ते ध्यान’ हा अभंग आवर्जून गात असत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू अशा काही राज्यांत तुकोबारायांची सुंदर मंदिरेही आहेत. गीता नारायणस्वामी यांनी तुकोबारायांचे चरित्र तमिळ मध्ये अनुवादित केले आहे. एक तमिळ गणपती नावाचे साधक तुकाराम हे नाव धारण करून जगभर तुकोबारायांच्या विचारांचा प्रसार करत आहेत. चेन्नईमधील दोन रस्त्यांनाही तुकोबारायांचे नाव देण्यात आले आहे. आंध्र प्रदेशमध्ये तेलगु ‘भक्त तुकाराम’ हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला होता.
पश्चिम बंगालमधील लोकमानसावर तुकोबांचा प्रभाव विशेष जाणवतो. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित राय यांनी प्रेरणास्रोत असणाऱ्या तुकोबारायांचे अप्रतिम चित्र रेखाटले होते. हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांनी संत तुकोबारायांवर इंग्रजीतून नाटक लिहिले होते. भारतातले पहिले आयएएस अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर यांनी तुकोबांवर लिहिलेल्या दीर्घ निबंधात त्यांचे विद्रोही लढाऊ, निर्भीड रूप प्रतिपादीत केले होते.
रवींद्रनाथ टागोर यांनी तुकोबारायांचे १२ अभंग बंगाली भाषेत अनुवादित केले होते. योगेंद्रनाथ बसू हे तुकोबारायांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे अवलोकन करण्यासाठी आवर्जून मराठी शिकले होते. १९३० मध्ये पुण्याच्या येरवडा कारागृहात महात्मा गांधीजींनी तुकोबांच्या १६ अभंगांचा अनुवाद इंग्रजी आणि गुजराती भाषेत केला होता. कन्नड अभिनेते डॉ. राजकुमार यांची ‘संत तुकाराम’ या कन्नड चित्रपटात तुकोबांची भूमिका केली होती. विरुपाक्ष कुलकर्णी यांनी तुकोबारायांचे चरित्र कन्नडमध्ये अनुवादीत केले आहे. सिंधी आणि हिंदी भाषिकांमध्येही तुकाराम महाराज विशेष लोकप्रिय आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मूकनायक या पाक्षिकामध्ये शीर्षकाखाली तुकोबांच्या
नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण।
सार्थक लाजोन नव्हे हित॥
या अभंगाचा प्रभावीपणे उल्लेख करत होते. प्रार्थना, सत्यशोधक, ब्राम्हो समाजावर तुकोबारायांचा विशेष प्रभाव होता. न्यायमूर्ती रानडे हे न्यायनिवाडा करताना तुकोबारायांच्या अभंगांचा आधार घेत होते. लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथाची सुरुवात प्रस्तावनेतील ‘संतांची उच्छिष्ठे बोलतो उत्तरे । काय म्या पामरे जाणावे हे ॥’ या तुकोबारायांच्या अभंगाने केली आहे. मिसाईल मॅन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम हे तुकाराम गाथेचे मोठे अभ्यासक होते. देहूच्या मातीत प्रसवलेले तुकोबारायांचे विचार सर्व भारत देशाला मार्गदर्शक ठरत आहेत.