FYJC admission 2025 last date extended
पुणे: राज्यातील राबविण्यात येत असलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीतील प्रवेशांसाठी बुधवारपर्यंत (दि. 10) मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.
सर्वांसाठी खुला प्रवेश अंतर्गत विशेष फेरीची निवडयादी रविवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात कला शाखेसाठी 4 हजार 437, वाणिज्य शाखेसाठी 3 हजार 979, तर विज्ञान शाखेसाठी 6 हजार 904 अशा एकूण 15 हजार 320 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. (Latest Pune News)
त्यापैकी 3 हजार 218 विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रक्रियेद्वारे, तर 361 विद्यार्थ्यांनी राखीव कोट्याद्वारे प्रवेश घेतला. तर 11 हजार 741 विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. मुंबई विभागात सोमवारी (8 सप्टेंबर) सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना विशेष फेरीअंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट केले आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 544 महाविद्यालयांमध्ये 18 लाख 22 हजार 298 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 3 लाख 45 हजार 244 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 67 हजार 542 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 14 लाख 83 हजार 33 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
त्यापैकी 11 लाख 56 हजार 578 विद्यार्थ्यांनी कॅपमधून तर 1 लाख 68 हजार 62 विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत अशा 13 लाख 24 हजार 640 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आता प्रवेशासाठी अद्यापही 6 लाख 65 हजार 720 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 1 लाख 77 हजार 182 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 8 लाख 42 हजार 902 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.