Fursungi Waste Depot Protest Pudhari
पुणे

Fursungi Waste Depot Protest: फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोवरून ग्रामस्थ आक्रमक; नवीन प्रकल्पाविरोधात २० दिवसांपासून आंदोलन

२०१७ च्या आदेशाचा दाखला देत ग्रामस्थांचा सवाल; ५०० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प रद्द करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

फुरसुंगी: फुरसुंगी-उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये यापुढे नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प करू नयेत तसेच टप्प्याटप्प्याने येथील कचरा डेपो बंद करावा, असे आदेश २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. असे असतानाही पुन्हा याच ठिकाणी नवीन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने महापालिका प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासत असल्याचा आरोप फुरसुंगी-उरुळी देवाची ग्रामस्थांनी केला आहे.

परिसरात प्रस्तावित ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या नव्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला तीव्र विरोध करत दोन्ही गावांतील ग्रामस्थ आणि नागरी कृती समितीच्या वतीने गेल्या २० दिवसांपासून फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपो येथे आंदोलन सुरू आहे. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील आंदोलनस्थळी भेट देत ग्रामस्थांच्या मागणीला पाठिंबा देत आहेत. विशेष म्हणजे आंदोलनाच्या काळात ग्रामस्थांनी एकही कचरागाडी अडविलेली नसताना पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे सांगितले जात आहे.

नवीन प्रक्रिया प्रकल्पामुळे येथील रहिवाशांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, असे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. मात्र, पुणे शहराच्या आसपास दोन हजार एकरांहून अधिक सरकारी अथवा गायरान जमीन उपलब्ध असताना केवळ फुरसुंगी-उरुळी देवाची परिसरातच नवीन प्रकल्प उभारण्याचा महापालिकेचा अट्टहास का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे टेंडर मंजूर होऊन वर्क ऑर्डरही काढण्यात आल्याची माहिती आहे. फुरसुंगी-देवाची नगरपरिषदेनेही नवीन प्रक्रिया प्रकल्प नको, असा ठराव करून तो महापालिकेला दिला आहे. प्रकल्प परिसरात नियमांचे पालन होत नसल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळापुढे आंदोलन केले होते. त्यानंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून, ते आठवडाभरात अहवाल सादर करणार आहेत. नवीन प्रकल्पाची वर्क ऑर्डर रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

शहरात कचरा साचलाच कसा?

आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी कचऱ्याची एकही गाडी अडविली नसताना पुणे शहरात कचरा साचलाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे येथील प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा घेतला जात आहे. महापालिका ग्रामस्थांची सरळसरळ फसवणूक करीत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते विशाल हरपळे यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT