Fursungi Uruli Devachi Nagar Parishad Pudhari
पुणे

Fursungi Uruli Devachi Municipal Council: फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील २८ नगरसेवकांवर बनावट कागदपत्रांचे आरोप; चौकशीचे आदेश

राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सात दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील नगराध्यक्ष संतोष सरोदे यांच्यासह २८ नगरसेवकांनी निवडणुकीत शपथपत्रासोबत बनावट कागदपत्रे जोडल्याचा आरोप करीत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका प्रशासन शाखेने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सामाजिक कार्यकर्ते नितीन ऊर्फ नीतेश गायकवाड यांनी ही तक्रार केली आहे. संबंधित नगरसेवकांनी नियमांचे उल्लंघन करून निवडणूक लढविल्याचा दावा करीत त्यांचे सदस्यत्व रद्द करून नवीन प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, या आरोपांची सत्यता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका प्रशासन शाखेने फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. तक्रारीसोबत संबंधित कागदपत्रे जोडण्यात आल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तक्रारदाराने यापूर्वीही या प्रकरणाबाबत वारंवार अर्ज केल्याचा उल्लेख पत्रात आहे.

दरम्यान, काही नगरसेवकांनी निवडणूक लढवताना थकबाकी असतानाही थकबाकी नसल्याचा दाखला सादर केल्याचा, काहींनी स्वतःचे घर असतानाही घर नसल्याचे नमूद केल्याचा तसेच एका नगरसेवकाचे नाव दोन विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयादीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय पाटबंधारे विभागाच्या आणि गायरान जमिनीवरील अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामांबाबतही तक्रार करण्यात आली आहे. या सर्व बाबींची चौकशी करून अहवाल विनाविलंब जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राजकीय कुरघोडी करण्याच्या उद्देशाने काही जणांकडून अशा खोट्या तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र, या तक्रारींमध्ये कोणतेही तथ्य नसल्याने त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. याबाबतचे आमचे खुलासे मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत.
संतोष सरोदे, नगराध्यक्ष, फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद
काही नगरसेवकांनी निवडणूक लढवताना थकबाकी असतानाही थकबाकी नसल्याचा दाखला जोडला आहे. काहींनी स्वतःचे घर असतानाही घर नसल्याचे दाखवले आहे. तसेच, काही नगरसेवकांबाबत अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी आहेत. नियमांचे उल्लंघन करून निवडणूक लढवणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी.
नितीन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, फुरसुंगी
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या पत्राची दखल घेत संबंधित नगरसेवकां कडून खुलासा मागवण्यात आला आहे. सर्वांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवण्यात येईल.
प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी, फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT