Fursungi Uruli Garbage Depot Pudhari
पुणे

Fursungi Uruli Garbage Depot: फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपो प्रश्नावर नागरिक आक्रमक; आश्वासनांच्या अंमलबजावणीची मागणी

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णय तातडीने लागू करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा, कचरा विकेंद्रीकरणावर नागरिकांचा भर

पुढारी वृत्तसेवा

फुरसुंगी: फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपो प्रश्नावर नागरिकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत देण्यात आलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी; अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ आणि नागरिक कृती समितीच्या वतीने पुन्हा देण्यात आला आहे.

याबाबत महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना कृती समितीच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रणजित रासकर, विशाल हरपळे, भूपेंद्र बेंगळे, अनिकेत काळे, प्रतीक हरपळे उपस्थित होते. पुणे शहरातील प्रत्येक वॉर्डस्तरावर १५ ते २५ टन क्षमतेचे कचराप्रक्रिया प्रकल्प उभारून उरुळी-फुरसुंगी कचरा डेपोवरील ताण कमी करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

तसेच, फुरसुंगी-उरुळी देवाची येथे नव्याने कोणताही मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारू नये, कोथरूड रॅम्पवरून दररोज येणारा सुमारे २०० मेट्रिक टन कचरा फुरसुंगी-उरुळी देवाची डेपोवर टाकणे तातडीने बंद करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. शहरातील सर्व कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून कचऱ्याचे विकेंद्रीकरण करावे, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

फुरसुंगी-उरुळी देवाची येथील विद्यमान मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढविताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले गेले नसल्याचा आरोप करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिरिक्त कचरा बंद करून केवळ २०० मेट्रिक टन कचऱ्यावरच प्रक्रिया करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या लिचेटवर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी प्रकल्प तातडीने कार्यान्वित करावा, तसेच बायोमायनिंग प्रकल्पातील गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून लाखो मेट्रिक टन कचरा डेपोवर साचून राहिल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधी व आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा जुना कचरा तातडीने हटवून त्या ठिकाणी आश्वासनानुसार गार्डन विकसित करावे.
रणजित रासकर, सामाजिक कार्यकर्ते, फुरसुंगी
महापालिकेने फुरसुंगी व उरुळी देवाची या दोन्ही गावांचे पालकत्व स्वीकारून विविध विकासकामे करावीत. तसेच कचरा या विषयाची स्वतंत्र श्वेतपत्रिका काढावी.
विशाल हरपळे, सामाजिक कार्यकर्ते, फुरसुंगी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT