Mutha Canal Overflow Pudhari
पुणे

Pune Mutha Canal Overflow Risk: फुरसुंगीत उजवा मुठा कालवा ओव्हरफ्लो; भिंतींना तडे, फुटीचा धोका

कालव्याच्या भिंती कमकुवत; शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

फुरसुंगी: फुरसुंगी परिसरातील उजवा मुठा कालवा सध्या काठोकाठ भरल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कालव्याच्या अनेक ठिकाणी भिंती कमकुवत झाल्या असून, काही भागांत भराव खचल्याचे दिसून येत आहे. तसेच, काही ठिकाणी कालव्याच्या भिंतीतून पाणी पाझरत असल्याने भविष्यात मोठा अपघात किंवा कालवा फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कालवा पूर्णक्षमतेने भरलेला असल्याने ओव्हरफ्लोची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, कालव्यालगत असलेल्या फुरसुंगी परिसरातील शेती पाण्याखाली जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक आणि शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कालव्याच्या कडेला असलेली माती अनेक ठिकाणी खचली असून काही भागात संरक्षण भिंतींना तडे गेले आहेत. भिंतीतून सतत पाणी झिरपत असल्याने कालव्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. विशेषतः कालव्यालगत घरे असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, कोणतीही दुर्घटना घडल्यास मोठे नुकसान होऊ शकते, अशी चिंता व्यक्त होत आहे.

या गंभीर परिस्थितीबाबत पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी देखील जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कालवा सतत ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने तो फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत. जलसंपदा विभागाने तातडीने पाहणी करून भिंतींची दुरुस्ती, भराव मजबुतीकरण अशा उपाययोजना कराव्यात.
बाळासाहेब (पिंटू) हरपळे, शेतकरी, फुरसुंगी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT