Liquor Pudhari
पुणे

Methanol Liquor Bust: फुगेवाडी दारूकांडाचा मोठा खुलासा; 155 लिटर विषारी दारू जप्त, मिथेनॉलचा खेळ उघड

उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; मृत्यूपूर्वीच साठा ताब्यात, संपूर्ण रॅकेटचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: काळ बनून आलेल्या विषारी दारूचे 35 लिटरचे 16 कॅन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने विक्रीपूर्वीच ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही दारू जर विक्री केली गेली असती, तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला असता. वडारवाडी, गोखलेनगर परिसरातून 12 कॅन, तर फुगेवाडी येथून 4 कॅन (155 लिटर) दारू जप्त केली आहे. या दारूमध्ये तब्बल 50 लिटर मिथेनॉल मिसळलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पिंपरीतील फुगेवाडी परिसरात गुरुवारी (दि. 28) एकामागे एकाचा संशयास्पद मृत्यू झाला. दारूमुळे हे मृत्यू झाल्याचा संशय बळावताच उत्पादन शुल्क विभागाने रॅकेटचा माग काढला. प्रथम फुगेवाडीलीत दारूविक्रेता कर्नेलसिंहविरका याला पकडले. चौकशीत ही दारू योगेश व्हानकडे उर्फ सिकंदर राठोड याने आपल्याला आणून दिल्याचे सांगितले. मध्यरात्रीच मुंढव्यातून राठोड याला ‌‘एक्साईज‌’च्या पथकाने पकडले. त्याने सांगितले ही दारू त्याने उरुळी कांचन येथील राधेश्याम प्रजापती याच्याकडून आणली आहे. त्यालाही ताब्यात घेण्यात आले. प्रजापती आणि राठोड या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी केली. त्यावेळी राठोड सांगितले, मी दारूत मिथेनॉल मिसळले आहे. दारू अधिक कडक करण्यासाठी त्याने हा उद्योग केला होता.

राठोड याने प्रजापती याच्याकडून 35 लिटरचे 12 हत्ती कॅन दोन लॉटमध्ये आणले होते. त्याने त्यामध्ये पाणी आणि शंभर लिटर मिथेनॉल टाकून 24 कॅन केले. त्यानंतर ही दारू हडपसर, फुगेवाडी आणि वडारवाडी, गोखलेनगर येथे विक्रीसाठी दिली होती. हडपसर येथील पांढरे मळ्यातील आणि फुगेवाडीतील दारू प्यायल्याने नागरिकांचा मृत्यू झाला. याच दारूतील 12 कॅन दारू वानखेडे याने वडारवाडी येथील आर्यन धोत्रे याला विक्रीसाठी दिले होते, तर 155 लिटर दारू फुगेवाडीतील इरफान कुरेशी याला दिली होती. या दोघांनी त्या दिवशी दारू विक्री केली नव्हती. उत्पादन शुल्क विभागाने रॅकेटचा माग काढत वडारवाडीपर्यंत धडक मारली. येथील साठा वेळेत जप्त न झाल्यास ही दारू पुन्हा विक्रीसाठी वितरित होण्याची पूर्ण शक्यता होती.

तपास अधिकाऱ्यांच्या मते, हा साठा बाजारात पोहोचला असता तर मृतांचा आकडा वाढला असता. मात्र, त्यापूर्वीच शुक्रवारी पहाटेच्या सुमारास वडारवाडी परिसरात छापा टाकून येथे विक्रीसाठी लपवून ठेवलेली 12 कॅन दारू जप्त करण्यात आली. तपासात या दारूमध्ये मोठ्या प्रमाणात मिथेनॉल मिसळल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईदरम्यान धोत्रे याला ताब्यात घेतले आहे. कुरेशी याच्याकडून देखील ही दारू जप्त केली. या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. फुगेवाडी आणि हडपसरमध्ये आधीच विषारी दारूने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले असताना, गोखले नगरमधील साठा जप्त होणे ही अत्यंत निर्णायक कारवाई मानली जात आहे. या संपूर्ण रॅकेटची मुळे शोधण्याचे काम उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.

मुंबईतून ऑनलाईन मिथेनॉल खरेदी

व्हानकडे उर्फ राठोड याने ऑनलाईन इंडिया मार्ट या संकेतस्थळावरून 215 लिटर मिथेनॉल खरेदी केले होते. त्याने प्रजापती याच्याकडून दारू आणल्यानंतर खडकीतील विरका याच्या नातेवाईकाच्या स्नॅक्स सेंटरमध्ये दारूमध्ये मिथेनॉल मिसळले. त्यानंतर ही दारू विविध ठिकाणी विक्रीला दिली होती. दरम्यान, मिथेनॉल खरेदीसाठी जीएसटी क्रमांक लागतो. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगीने ते खरेदी करावे लागते; परंतु राठोड याला ते कसे उपलब्ध झाले, हा मोठा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT