नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षांची कारकीर्द चांगली असल्यामुळे तिसर्यांदा ते पंतप्रधान होणार आहेतच; त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना विजयी करण्यासाठी आपण सगळे कामाला लागूया. भोसरी विधानसभा मतदारसंघातून आढळराव यांना एक लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी माझी, असे प्रतिपादन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक घेतली.
या बैठकीला आमदार महेश लांडगे, महायुतीचे उमेदवार शिवजीराव आढळराव पाटील, आमदार राहुल कुल, हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके, जयश्री पलांडे, आबा तुपे, जयसिंग एरंडे, डॉ. ताराचंद कराळे, राम गावडे, संतोष खैरे आदींसह शिरूर लोकसभेतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा आदरयुक्त दबदबा निर्माण झाला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाला सर्वाधिक पसंती मिळत आहे. राज्यामध्ये महायुती आहे. सगळ्यांच्या विचाराने शिवाजीराव आढळराव यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
त्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे. शिवाजीराव आढळराव यांना सर्वाधिक मतांनी विजयी करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे, अशा सूचना त्यांनी दिल्या. या मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे मतदारसंघात कधी फिरकले नाहीत. याउलट शिवाजीराव आढळराव यांनी मागील पाच वर्षांत मतदारसंघात जास्तीत जास्त कामे केली आहेत. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीमुळे भोसरी व जुन्नर तालुक्यासह आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली व हडपसरमधील भाजप कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागणार असल्याने शिवाजीराव आढळराव यांना अधिक बळ मिळण्यास फायदा होणार आहे.
हेही वाचा