पुणे: किशोरवयीन मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे, यासाठी एचपीव्ही लस मोफत देण्याचा प्रयत्न असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील अर्थसंकल्पात नमूद केले होते. या धर्तीवर लवकरच लस मोफत उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग आला. ‘स्वस्थ नारी’ या संकल्पनेच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कर्करोग आहे. दरवर्षी कर्करोगाचे सुमारे 80 हजार नवे रुग्ण आढळतात आणि 42 हजारांहून अधिक महिलांचा मृत्यू होतो. वैज्ञानिक अभ्यासानुसार गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या जवळपास सर्व प्रकरणांमागे एचपीव्ही संसर्ग कारणीभूत असतो.
विशेषतः एचपीव्ही प्रकार 16 आणि 18 हे भारतातील 80 टक्क्यांहून अधिक रुग्णांसाठी जबाबदार आहेत. एचपीव्ही लस संसर्ग होण्याआधीच प्रतिबंध करते आणि त्यामुळे पुढे कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो, असेही स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत कार्डासिल ही क्वॉड्रिव्हॅलंट एचपीव्ही लस वापरण्यात येणार आहे. ही लस एचपीव्ही 16 व 18 (कर्करोगास कारणीभूत) तसेच 6 व 11 प्रकारांपासून संरक्षण देते. जागतिक पातळीवर 2006 पासून आतापर्यंत 50 कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले असून, लसीची सुरक्षितता व प्रभावकारिता 93 ते 100 टक्के असल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. ही लस नॉन-लाईव्ह असल्याने एचपीव्ही संसर्ग होत नाही, तसेच तिचा सुरक्षिततेचा मजबूत इतिहास आहे, असेही सूत्रांनी नमूद केले.
‘गावी’मार्फत लस खरेदी
अखंडित लस उपलब्धतेसाठी भारताने ‘गावी’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने गार्डासिल लसींची खरेदी केली आहे. भारताच्या औषध नियंत्रक संस्थेने मान्यता दिलेल्या या लसी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत पात्र मुलींना मोफत दिल्या जाणार आहेत.
देशात ‘मेड इन इंडिया’ एचपीव्ही लस लवकरच
दरम्यान सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे आदर पुनावाला यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, लवकरच ‘मेड इन इंडिया’ एचपीव्ही लस राष्ट्रीय लसीकरणसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.