

पुणे: सध्या देशभरात मुबलक प्रमाणात सुकामेवा आहे. इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सुकामेव्याच्या दरावर महिनाभरानंतर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. सद्य:स्थितीत देशात इराण येथून येणाऱ्या मामरा बदाम, पिस्ता आणि खारा पिस्ताच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, रमजानच्या मागणीमुळे ही दरवाढ झाली आहे. येत्या काळात युद्ध चिघळल्यास सुकामेव्याच्या भावात आणखी दर वाढण्याची शक्यता व्यापारीवर्गाकडून व्यक्त करण्यात आली.
गुलटेकडी मार्केट यार्डातील सुकामेव्याची व्यापारी नवीन गोयल म्हणाले की, सद्य:स्थितीत देशभरात सुकामेव्याचा मुबलक पुरवठा आहे. मात्र, रमजानच्या मागणीमुळे सुकामेव्याच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. युद्ध एक महिन्याच्या पुढे गेल्यास सुकामेव्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या 20 मार्च रोजी रमजान ईद आहे.
अद्याप रमजानची अपेक्षित खरेदी सुरू झालेली नाही. देशभरात किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, ठोक व्यापारी, तसेच प्रवासातील माल पाहता चार महिने पुरेल एवढा साठा आहे. त्यामुळे, महिनाभर तरी फार मोठी दरवाढ होण्याची शक्यता नसल्याचे गोयल यांनी नमूद केले.