पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात पाच जणांनी मिळून एकाची पाच कोटी 25 लाख 25 हजार 750 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 डिसेंबर 2019 रोजी वाकड येथे घडला.
संजय पांडुरंग कलाटे (42, रा. माउंट वर्ट ट्रोपेज, सोसायटी, वाकड) यांनी सोमवारी (दि. 28) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जयंत वल्लभदास कनेरिया (रा. पाषाण, पुणे), धीरजलाल गोवर्धनदास हंसालिया (रा. बाणेर, पुणे), अजय बिपीनचंद्र जव्हेरी आणि एक महिला आरोपी (दोघेही रा. बाणेर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कनेरिया, हंसालिया आणि फिर्यादी कलाटे यांचे माउंट वर्ट असोसिएट या फर्मचे व्यावसायिक भागीदार आहेत. दरम्यान, आरोपी कनेरिया आणि हंसालिया यांनी महिला आरोपी आणि जव्हेरी यांच्याशी संगनमत केले.
16 फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर फिर्यादी यांची सही न घेता सदरचे फ्लॅट महिला आरोपी आणि जव्हेरी यांना कमी किमतीमध्ये म्हणजे दहा कोटी 55 लाख रुपयांना विकले.
तसेच, आलेली रक्कम फर्मच्या नावे खात्यात जमा करणे आवश्यक असताना आरोपींनी सहा कोटी 32 लाख 44 हजार 250 रुपये जमा केले. उर्वरित चार कोटी 22 लाख 55 हजार 750 रुपये रुपयांचा आरोपींनी अपहार करून फसवणूक केली.
आरोपी जव्हेरी आणि महिला आरोपी यांनी तुटपुंज्या किमतीतील या मिळालेल्या सदनिका लगेच त्रयस्थ इसमांना वाढीव किंमतीला विकून त्यातून एक कोटी 2 लाख 70 हजार रुपये बेकायदेशीर रित्या नफा कमावला.
तसेच, आरोपींनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर फिर्यादी यांची सही व मान्यता न घेता पाच कोटी 25 लाख 25 हजार 750 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास वाकड पोलिस करीत आहेत.