पुणे

बारामती : गाळे विक्रीच्या व्यवहारात फसवणूक, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

backup backup

बारामती ; पुढारी वृत्तसेवा : गाळे विक्रीच्या व्यवहारात सुमारे १ कोटी ३७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नितीन मारुती काळे (रा. सणसर, ता. इंदापूर) व सुनील दत्तात्रय मदने (रा. काटी, ता. इंदापूर) अशी  गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तुळशीराम नारायण शिंदे (रा. काझड, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली. दि. ७ ऑक्टोबर २०१५ ते ३ फेब्रुवारी २०१७ च्या दरम्यान ही घटना घडली.

फिर्यादीत म्‍हटलं आहे की, फिर्यादी यांचा शिंदे इंजिनिअर्स ॲण्ड कन्स्लटंटचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे २०१४ ते २०१७ या कालावधीत एका कंपनीची डिलरशीप होती. त्यांना व्यवसायासाठी बारामतीत गाळा हवा होता. शहरातील बस स्थानकाशेजारी काळे प्रेस्टिज या इमारतीमधील गाळा क्रमांक १५ व १६ घेण्याचे त्यांनी निश्चित केले. या दोन्ही गाळ्यांचा व्यवहार सुमारे १ कोटी ३७ लाख रुपयांना झाला. त्याचा खरेदी दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवण्यात आला. मात्र पुढे फिर्यादी यांनी हे दोन्ही गाळे पंजाब नॅशनल बॅंकेकडे गहाणवट ठेवत त्यावर व्यवसायासाठी ८० लाख रुपयांचे कर्ज घेतले. फिर्यादी हे व्यवसायाच्या अनुषंगाने लोकांना शेती विकास कर्ज प्रकरणात स्वतः आर्थिक सहाय्य करत होते. त्यापोटी अनेकांची एक चतुर्थांश रक्कम त्यांनी भरली होती.

त्यातील अनेकांनी त्यांची फसवणूक केली. परिणामी फिर्यादी यांचा व्यवसाय डबघाईला आला. त्यांचे बॅंकेचे हप्ते थकले. त्यामुळे त्यांनी हे दोन्ही गाळे विक्रीला काढले. एकाशी त्यानुसार व्यवहार ठरला. त्यानुसार साठेखत व कुलमुखत्यारपत्र करण्यात आले. ही माहिती काळे व मदने यांना समजताच त्यांनी गाळा तिऱ्हाईताला विकू नका, आम्ही ते जास्त किमतीने घ्यायला तयार असल्याचे सांगितले.

त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी अगोदर केलेला व्यवहार रद्द केला.  दोन्ही गाळ्यांचा खरेदीदस्त काळे यांनी मदने यांच्या नावावर करून घेतले. या खरेदीवेळी आम्ही तुमचे पंजाब नॅशनल बॅंकेचे कर्ज भरतो, असा विश्वास संशयितांनी त्यांना दिला होता. शिवाय बेसमेंटमधील गाळा क्रमांक २ हा ६५ लाख रुपयांना खरेदी दिला.

फिर्यादीची आर्थिक स्थिती खालावल्याने त्यांनी पूर्वी १५ व १६ क्रमांकाच्या गाळ्याचा व्यवहार केलेल्या व्यक्तिलाच हा गाळा विकला. काळे व मदने यांनी फिर्यादीचे कर्ज भरले नाहीच. शिवाय त्यांच्याकडील १५ व १६ क्रमांकाचा गाळा घेतला. फिर्यादीने वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही त्यांनी कर्ज प्रकरणात एक रुपयाचीही मदत केली नाही. दरम्यानच्या काळात व्यवसायानिमित्त दिलेल्या पैशाच्या बदल्यात फिर्यादीवरच गुन्हा दाखल झाला. त्यात ते अनेक दिवस तुरुगांत राहिले. त्यामुळे त्यांना या प्रकरणाचा पाठपुरावा करता आला नाही. २०२० पासून त्यांनी पुन्हा पाठपुरावा सुरु केला. परंतु तरीही काळे व मदने यांनी दाद दिली नाही. गाळा क्रमांक १५, १६ व २ हा खरेदी देतेवेळी त्यावर कोणताही बोजा नसल्याचे काळे व मदने यांनी सांगितले होते. परंतु फिर्यादी यांनी कागदपत्रे तपासली असता त्यावर विविध बॅंकांचे ५ कोटी २५ लाखांचे कर्ज असल्याचे दिसून आल्‍याचेही फिर्यादीत म्‍हटलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT