Child Care
पुणे: "शेजारच्या काकूंचा नातू बघा कसा टम्म फुगलाय, आणि आपलं बाळ किती बारीक आहे..." ही तुलनाच तुमच्या मुलाचा आत्मविश्वास मारत आहे. घराघरांत बाळाला रडवून, हात धरून आणि मोबाईल दाखवून बळजबरीने जेवण भरवण्याचे प्रकार वाढत आहेत. यावर पुण्यातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सुजित भरत पाटील यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत मार्मिक पोस्ट लिहून पालकांचे कान टोचले आहेत.
डॉ. पाटील यांनी एका परिचितांकडचा अनुभव सांगताना म्हटले की, अनेक घरांमध्ये बाळाचे हात पकडून, समोर मोबाईल लावून त्याच्या तोंडात वरण-भाताचे गोळे कोंबले जातात. बाळ ते जेवण 'गिळत' नाही तर कसाबसा 'ढकलत' असते. केवळ "लोक काय म्हणतील" या भीतीपोटी आपण बाळाला जेवण देत नसून एक प्रकारची 'शिक्षा' देत आहोत. यामुळे मुले अन्नाचा तिरस्कार करायला लागतात. माझं बाळ बारीक राहिलं तर लोक काय म्हणतील? फक्त या एका भीतीपोटी बाळाला जबरदस्तीने भरवले जाते. पण, पालकांनो आपल्याला घरात खेळणार बाळ हवंय की फक्त वजन वाढलेली ब्रॉयलर कोंबडी? याचा विचार करा, असा सल्ला डॉ. पाटील यांनी दिला आहे.
१. बाळाचे पोट त्याच्या मुठीएवढेच
डॉक्टरांच्या मते, बाळाच्या पोटाची क्षमता त्याच्या स्वतःच्या मुठीएवढीच असते. आपण मोठ्यांच्या वाटीच्या मापाने त्याला ओव्हरफीड करतो, ज्यामुळे त्याची पचनशक्ती बिघडते आणि उलट्या होतात. त्याला सकस खाऊ द्या, पण प्रमाणात द्या.
२. वाढीचा वेग नैसर्गिकरित्या मंदावतो
पहिल्या वर्षात बाळाचे वजन वेगाने वाढते, पण १ ते ५ वर्षे या काळात वाढीचा वेग निसर्गतः मंदावतो. या काळात भूक कमी होणे हे पूर्णपणे सामान्य आहे, तो आजार नाही.
३. बिस्किटे आणि मोबाईल 'जेवणाचे खरे शत्रू'
"बाळ जेवत नाही" अशी तक्रार करणाऱ्या पालकांनी आधी घरातील बिस्किटांचे पुडे बाहेर फेकले पाहिजेत. साखर आणि मैद्यामुळे मेंदूला पोट भरल्याचा खोटा सिग्नल जातो. तसेच, मोबाईल दाखवून जेवण भरवल्याने मुलांचा अन्नाशी संपर्क तुटतो, ज्यामुळे पुढे जाऊन लठ्ठपणा आणि एकाग्रतेचा अभाव निर्माण होतो.
बाळ बारीक असणे म्हणजे ते आजारी असणे नव्हे. डॉक्टरांनी काही धोक्याचे इशारे सांगितले आहेत. जर बाळ दिवसभर सुस्त असेल आणि खेळत नसेल. जर लघवी नेहमीपेक्षा कमी होत असेल. जर वजनाचा ग्राफ सतत खाली जात असेल. असे होत नसेल, तर काळजी करण्याचे काहीही कारण नाही.
शेवटी एक गंभीर इशारा देताना डॉ. पाटील म्हणतात की, आज मुलांचे गाल फुगवण्यासाठी त्यांना बळजबरीने तूप-साखर भरवून 'गोल' केले तरी, वयाच्या २५ व्या वर्षी त्यांना होणाऱ्या बीपी आणि डायबिटीजची पायाभरणी आपणच करत असतो. त्याचे गाल मोजण्यापेक्षा दिवसभरात तो किती वेळा मनापासून हसला, हे मोजा, असा मोलाचा सल्ला त्यांनी पालकांना दिला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.