Pune Crime News Pudhari
पुणे

Pune Crime: संपत्तीपायी बहिणीला मनोरुग्णालयात, तर आईला वृद्धाश्रमात पाठविले; शेजाऱ्यांमुळे सुटका, पुण्यात निर्दयी भावाला अटक

Pune Property Dispute: वडिलोपार्जित मालमत्तेसाठी भावाने आपल्या मोठ्या बहिणीला मनोरुग्णालयात, तर आईला वृद्धाश्रमात पाठविले.

पुढारी वृत्तसेवा

For the sake of property, the brother sent his elder sister to a mental hospital and his mother to an old age home.

पुणे : वडिलोपार्जित मालमत्तेसाठी भावाने आपल्या मोठ्या बहिणीला इंजेक्शन देऊन ब्लड टेस्टच्या नावाखाली मनोरुग्णालयात, तर आईला वृद्धाश्रमात टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निर्दयी भावाला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली.

धर्मेंद्र इंदूर राय (वय ५४, रा. चेंबूर, मुंबई) असे अटक केलेल्या भावाचे नाव आहे. त्याच्याबरोबर ४ अनोळखी महिला बाउन्सरवरही विविध कलमांसह मेंटल हेल्थ केअर अधिनियमखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ५६ वर्षांच्या महिलेने चतुः शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सिंध हौसिंग सोसायटीत ७ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ ते १८ जुलैदरम्यान दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची वयोवृद्ध आई या सिंघ हौसिंग सोसायटीत त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहत होते. ही मालमत्ता ताब्यात घेण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांचा लहान भाऊ धर्मेंद्र राय हा चार महिला बाउन्सर घेऊन आला. त्यांची मानसिक स्थिती चांगली असतानाही त्यांच्या डाव्या हातामध्ये इंजेक्शन दिले.

त्यांना ब्लड टेस्टसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे, असे खोटे सांगितले. त्यांना चार महिला बाउन्सरच्या मदतीने जबरदस्तीने मनोरुग्णालयात दाखल करून त्यांचा मानसिक छळ केला. तसेच त्यांच्या वयोवृद्ध आईला तिची परवानगी न घेता जबरदस्तीने वृद्धाश्रमात दाखल केले. त्यांच्या राहत्या घराचा ताबा फिर्यादीकडे असताना देखील फिर्यादीची फसवणूक करून जबरदस्तीने फिर्यादींना घराबाहेर काढून घराचा ताबा घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शेजारी, मित्र-मैत्रिणी आल्या धावून

फिर्यादी यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकल्याचे समजल्यावर त्यांच्या शेजारी व इतर मित्र-मैत्रिणींनी त्यांची तेथून सुटका केली. त्यांना त्यांच्या घरी आणल्यावर धर्मेंद्र राय याने त्यांना घरात येण्यास अटकाव केला. तेव्हा त्यांनी पोलिसांना कळविले. चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज हांडे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी धर्मेंद्र राय याला अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT