पुणे

पिंपरी : गणरायाच्या निरोपासाठी 2 हजार पोलिस तैनात

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहर परिसरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील दोन हजारपेक्षा अधिक पोलिस रस्त्यावर तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त साध्या वेशातील विविध पथके कार्यान्वित केली असून, निगराणी ठेवण्यासाठी सर्वेलन्स व्हॅनदेखील गर्दीच्या ठिकाणी लावल्या जाणार आहेत.

पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एक हजार 934 गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. यातील एक हजार 86 मंडळांच्या गणेशमूर्तींचे गुरुवारी (दि. 28) विसर्जन होणार आहे. याव्यतिरिक्त परवानगी न घेता गणेशोत्सव साजरा करणारीदेखील काही मंडळे आहेत. त्यामुळे दरवर्षी विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठी गर्दी होते.

या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गणेशोत्सवासाठी बाहेरून बंदोबस्त मागवला आहे. दरम्यान, पोलिसांनी शहरातील शेकडो गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. बैठका घेऊन मंडळांना गर्दी, आवाज, सुरक्षा आदींबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच, प्रत्येक मंडळाचे पाच प्रतिनिधी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. यासोबतच ग्रामरक्षक दल, शांतता कमिटीचीदेखील मदत घेतली जाणार आहे. एकंदरीतच विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडण्यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी जय्यत तयारी केल्याचे दिसून येत आहे.

'आवाज वाढीव'; येणार अंगलट

विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे समोर आवाज वाढीव असे म्हणत गोंधळ घातला जातो. मात्र, या वेळी पोलिस कारवाईच्या मूडमध्ये आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी एक, असे एकूण 18 नॉइज लेव्हल (डेसीबल) मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

निगराणीसाठी आणखी 50 वॉकीटॉकी

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडे सध्या 300 वॉकी टॉकी आहेत. गणेश विसर्जनानिमित्त आणखी 50 वॉकी टॉकी मागवण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील विसर्जन मिरवणूक मार्ग, घाट, गर्दीची ठिकाणे अशा ठिकाणी एकत्रित वॉच राहणार आहे.

असा असेल बंदोबस्त
अपर पोलिस आयुक्त – 1
पोलिस उपायुक्त – 5
सहायक पोलिस आयुक्त – 8
पोलिस निरीक्षक – 59
सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक – 177
अंमलदार – 1665
होमगार्ड – 239
एसआरपीएफ – 1 कंपनी (100 जवान)
आरसीपी – 4
स्ट्राईकिंग – 18

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT