पुणे

Pune News : गुहिणी ठरणार पुणे जिल्ह्यातील पहिले ‘मधाचे गाव’

अमृता चौगुले

भोर (पुणे); पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पहिले 'मधाचे गाव' म्हणून भोर तालुक्यातील गुहिणी या गावाची निवड होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून येथील परिसराची पाहणी करून भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या संकल्पनेनुसार राज्यात एकूण 10 मधाची गावे करण्याचा मानस आहे.

मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील मधाचे गांव संकल्पना राबविण्याकरिता भोर तालुक्यातील गुहिणी या गावाची निवड होण्यासाठी मधकेंद्र योजनेंतर्गत जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाबळेश्वर मध संचालनालयाचे संचालक डी. आर. पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. आर. खरात, वेल्हे येथील तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास या सामाजिक संस्थेचे व्यवस्थापक रमेश आंबेकर, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ व मधपाळ उपस्थित होते.

महाबळेश्वर मध संचालनालयाचे संचालक पाटील यांनी मधकेंद्र योजनेची व 'मधाचे गाव' संकल्पना राबविण्याबाबतची माहिती दिली. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी खरात यांनी पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास योजना, मधकेंद्र योजना, मधाचे गांव याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर संचालक पाटील यांच्या हस्ते येथील जंगल परिसरात जांभूळ या वनस्पतीची लागवड करण्यात आली.

असे आहे हे गाव

गुहिणी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तोरणा, राजगड, मढेघाट परिसराच्या कुशीत वसलेले असून, भाटघर धरणाच्या पाठीमागील बाजूस निसर्गाच्या सान्निध्यात असलेले एक छोटेसे गाव आहे. मधमाशीपालनास उपयुक्त जांभूळ, आंबा, कारवी, करवर, अर्जुन, कांदळवन व आखरा आदी वनस्पतींचे फुलोरा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, गावातील सुमारे 15 मधपाळ पारंपरिक पद्धतीने आग्या, सातेरी, फुलोरी पिकळा मध गोळा करतात. विविध प्रकारच्या मधाच्या किमती आठशे ते एक हजार रुपये किलोच्या दरम्यान आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT