

पिंपरी : शहरामध्ये विविध कारणांसाठी विद्यार्थ्यांचे लेक्चर बंक करण्याचे प्रमाण सध्या 10 ते 15 टक्क्यांच्या दरम्यान आहे. लेक्चर बंक करुन कॅन्टीनमध्ये टाईमपास करणे, चित्रपटाच्या खेळाला जाणे किंवा कॅफे, उद्यान आदी ठिकाणी वेळ घालवण्याचे प्रकार वाढत चालले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनावर त्याचा परिणाम होत आहे. पर्यायाने, नापास होणे, एटीकेटी घेणे किंवा टक्केवारी कमी होणे असे प्रकार वाढत चालले आहेत.
कोरोनाच्या कालावधीत महाविद्यालये काही महिने बंद होती. त्या वेळी विद्यार्थ्यांनी घरी बसुन ऑनलाइन वर्गांना हजेरी लावली. कोरोनानंतर विद्यार्थ्यांमध्ये लेक्चर बंक करण्याचे प्रमाण वाढले आहे.
महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची 75 टक्के हजेरी पूर्ण होणे गरजेचे असते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची 75 टक्के हजेरी पूर्ण होत नाही त्यांना परीक्षेला बसता येत नाही. तथापि, विद्यार्थी पुर्ण दिवस लेक्चरला गैरहजर राहत नाही. एक लेक्चर बुडविणे किंवा दोन लेक्चर बुडविणे असे होत असल्याचे आढळले आहे.
महाविद्यालयीन स्तरावर काम करणार्या विद्यार्थ्यांमध्ये नोकरी करत अभ्यास करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नोकरीकडे जास्त लक्ष देऊन लेक्चर बुडविण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र, लेक्चर बुडविणे हा त्यावर पर्याय नसून विद्यार्थ्यांनी अभ्यासाला गांभीर्याने घ्यायला हवे, असे प्राचार्य आणि शिक्षकांचे म्हणणे आहे.
कोरोनापासून एकाच जागी बसण्याची विद्यार्थ्यांची सवय कमी झाली आहे. विद्यार्थी सरसकट लेक्चर बंक करतात, असे म्हणता येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांची एका ठिकाणी जास्त वेळ बसण्याची क्षमता नाही ते विद्यार्थी लेक्चर बंक करतात. काही विद्यार्थी नोकरी करत शिकत असल्याने ते पहिले प्राधान्य नोकरीला देतात. त्यामुळे त्यांचे लेक्चरकडे दुर्लक्ष होते.
– डॉ. रणजित पाटील, प्राचार्य,
डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, पिंपरी.कोरोनामुळे विद्यार्थ्यांची एका ठिकाणी बसण्याची सवय मोडली आहे. केजीपासून बारावीपर्यंत पालक विद्यार्थ्यांची काळजी घेतात. मात्र, त्यानंतरही त्यांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला हवे. वरिष्ठस्तर महाविद्यालयांमध्ये काही विद्यार्थी दोन लेक्चरला बसतात तर, दोन लेक्चर करत नाही, असे आढळते. हे प्रमाण 10 ते 15 टक्क्यांच्या दरम्यान आहे.
– डॉ. मनोहर चासकर,
अधिष्ठाता (विज्ञान व तंत्रज्ञान), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
हेही वाचा