पुणे: आधी डांबरीकरण आणि त्यानंतर पुन्हा रस्ता खोदल्याचा प्रकार धायरी ते डीएसके विश्वला जोडणार्या रस्त्यावर घडला आहे. या रस्त्याचे चार दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, सोमवारी (दि. 28) हा रस्ता एका खासगी ठेकेदाराने येथील एका इमारतीची सांडपाणी वाहिनी जोडण्यासाठी बेकायदेशीरीत्या जेसीबीने खोदून जुनी सांडपाणी वाहिनी तोडली.
याबाबत नागरिकांनी जाब विचारत हे काम बंद पाडले. तसेच याबाबत महापालिकेच्या पथ विभागाकडे नागरिकांनी तक्रार केली. त्यानंतर महापालिकेने नांदेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धायरी परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथील रस्ते दुरुस्त करण्यात यावेत, यासाठी स्थानिक नागरिक मागणी करत असतात. दरम्यान, येथील धायरी ते डीएसके विश्व रस्त्यावर चामुंडा हॉटेल ते डीएसके विश्व कमानदरम्यानच्या रस्त्यावर चार दिवसांपूर्वी डांबरीकरण केले होते.
मात्र, सोमवारी सकाळी हा रस्ता जेसीबीने खोदण्यात आला. नुकताच तयार केलेला रस्ता खोदल्यामुळे स्थानिकांनी याप्रकरणी कामगाराकडे चौकशी केली. या वेळी हे काम भाजपच्या एका माजी नगरसेवकाच्या पीएचे असल्याचे समोर आले.
दरम्यान, हा रस्ता चार दिवसांपूर्वी डांबरीकरण केल्यावर खोदला का, असा जाबदेखील नागरिकांनी विचारला. हा रस्ता खोदताना महापालिकेच्या पथ, मलनिःसारण विभागाचे अभियंतेदेखील उपस्थित नव्हते. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत हे काम बंद पाडले.
परवानगी न घेता खोदला रस्ता
या बाबत पथ विभागाचे उपअभियंता नरेश रायकर, मलनिःसारणचे निशिकांत छापेकर, शुभम देशमुख यांना विचारणा केली असता, हा रस्ता खोदण्यासाठी परवानगी दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, हे काम किशोर पोकळे यांच्या पाठपुराव्याने केल्याने त्यांना ही बाब कळताच त्यांनी घटनास्थळी येत याप्रकरणी ठेकेदाराला जाब विचारला. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांनी हे काम बंद पाडले. हे काम येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या इमारतीला अनधिकृतपणे सांडपाणी वाहिनी जोडण्यासाठी सुरू असल्याचे समोर आले.
अखेर ठेकेदारावर गुन्हा दाखल
चव्हाण बाग ते डीएसकेपर्यंत असलेला व नुकतेच डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता विनापरवाना खोदल्याने दिनेश चौधरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महापालिकेच्या अधिकार्यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
रस्ता खोदल्यामुळे वाहतूक कोंडी
हॉटेल चामुंडा ते डीएसके विश्व कमान हा रस्ता आधीच अरुंद आहे, त्यातच गर्दीच्या वेळी बेकायदेशीरपणे रस्ता खोदून ठेवला. त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
नवीन रस्ता बेकायदेशीरपणे खोदल्याचे खपवून घेतले जाणार नाही. संबंधित सर्वांवर गुन्हा दाखल केला जाईल. तसेच, संबंधित बांधकाम व्यावसायिकाची तक्रार बांधकाम विभागाकडेही केली जाईल.- अनिरुद्ध पावसकर, पथ विभागाचे प्रमुख, पालिका